माथेरानमधील आपत्ती व्यवस्थापन नावापुरतेच

नागरी समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; मुख्याधिकाऱ्यांविरोधात अविश्वासाची मागणी

| नेरळ | प्रतिनिधी |

माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी पावसाळ्यातील चार महिने सर्वाधिक झाडे कोसळण्याचे प्रमाण असते. या काळात आपत्ती व्यवस्थापनाची सर्वाधिक कसोटीचा काळ असतो. मात्र, त्यात यंदा माथेरान नगरपरिषद कमी पडत असल्याचे दिसून येत आहे. शहरात असलेल्या पेव्हर ब्लॉक रस्त्यांवर साधी ब्लिचिंग पावडर देखील टाकण्यात आलेली नाही. त्यामुळे त्याचा भार स्थानिक पातळीवर नगरसेवकांना उचलावा लागत आहे. नगर परिषद प्रशासनाकडून नागरी समस्या सोडवण्याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या या उदासीन कारभारामुळे मुख्याधिकाऱ्यांविरोधात अविश्वास ठराव आणण्याची मागणी शहरातील नागरिक करीत आहेत.

माथेरान शहरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचून राहते. त्यामुळे जीवजंतूंमुळे आरोग्याचा प्रश्न उद्भवू शकतो. शहरातील पेव्हर ब्लॉक रस्त्यांवर शेवाळ साचल्यामुळे पाय घसरून अपघात होण्याची शक्यता असते. तसेच, या ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याचे प्रमाण देखील अधिक आहे. असे असतानाही याबाबत माथेरान नगरपरिषद प्रशासनाकडून मान्सूनपूर्व काळात कोणतीही खबरादारी घेण्यात आलेली दिसत नाही. माथेरानमध्ये मान्सूनपूर्व काळात जंतुनाशक औषधांची फवारणी, ब्लीचिंग पावडर टाकणे, धूप प्रतिबंधक बंधारे उभारणे इत्यादी आवश्यक उपाययोजना होणे अपेक्षित असताना, यंदा अशा कामांच्या पूर्वतयारीचा अभाव दिसून येत आहे. त्यामुळे माथेरानमधील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, स्थानिक पातळीवर नगरसेवक आपल्या वैयक्तिक खर्चातून हा भार उचलत आहेत.

यंदा प्रशासनाकडून साधी ब्लिचिंग पावडर टाकण्यात आलेली नाही. त्यामुळे माथेरानमधील संत रोहिदास नगर आणि पंचशील नगर येथील पेव्हर ब्लॉक रस्त्यांवर शेवाळ साचल्यामुळे अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन, नगरसेवक सचिन दाभेकर यांनी स्वतःच्या खर्चातून त्याठिकाणी ब्लीचिंग पावडर टाकण्याचे काम केले. मुख्याधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधीनींकडून वारंवार सूचना केल्यानंतर देखील मान्सूनपूर्व आवश्यक नागरी सुविधा पुरविल्या जात नसतील, तर त्या सुविधा नगरसेवकांनीच स्वतःच्या खर्चातून द्यायच्या का? मग नागरिकांकडून कर वसूल करण्याचा उद्देश काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

त्यामुळे मान्सूनपूर्व कामांकडे दुर्लक्ष करणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांविरोधात सत्ताधारी नगरसेवकांनी अविश्वासाचा ठराव आणावा, त्याला विरोधी पक्षाच्या नगरसेवकांचा बिनशर्त पाठिंबा राहील, अशी भूमिका देखील सचिन दाभेकर यांनी स्पष्ट केली आहे. तसेच, या संदर्भात नगरपरिषदेच्या सभेत तसेच नगरपरिषदेच्या अधिकृत समाज माध्यमांवर वारंवार सूचना करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही केली जात नाही. त्यामुळे माथेरान नगरपरिषद प्रशासन धृतराष्ट्राची भूमिका घेत असल्याचा आरोप करत दाभेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, नागरिक आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नावर विद्यमान सत्ताधारी नगरसेवक नेमकी कोणती भूमिका घेतात, याकडे आता संपूर्ण माथेरानकरांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version