। तळा । वार्ताहर ।
तळा नगरपंचायतीतर्फे शहरातील जोगवाडी येथील श्री चंडिका देवी मंदिर व पुसाटी येथे छत्रपती शिवाजी महाराज मंदिर येथे नगराध्यक्षा माधुरी घोलप यांच्या अध्यक्षतेखाली दरडग्रस्त भागात आपत्तीव्यवस्थापनाची सभा घेण्यात आली.
तळगड किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेल्या जोगवाडी व पुसाटी या वाड्यांचे दरडींपासून संरक्षण करणे, त्यांचे सुरक्षित ठिकाणी स्थळांतर करणे. दरड प्रवण क्षेत्रामध्ये तातडीने शासनाची मुदत उपलब्ध करुन देणे, याकरीता या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तळा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांनी दरड भागातील नागरीकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेल्या या दोन्ही वाड्यांमधील नागरीकांनी शक्यतो जास्त पाऊस असल्यास सुरक्षित स्थळी स्थळांतर करावे. त्याकरीता नगरपंचायती मार्फत गो. म. वेदक विद्यामंदिर तळा, राधाकृष्ण मंदिर, चंडिका मंदिर, जी.एम. व्ही इंजिनियरिंग कॉलेज याठिकाणी रहाण्याची व्यवस्था केलेली आहे. त्याकरीता लागणारी संपूर्ण मदत नगरपंचायत स्तरावरुन करण्यात येईल. नागरीकांनी दिवसा व रात्रीच्या वेळेस सतर्क राहून काही आपत्ती निदर्शनास आल्यास नगरपंचायतीमध्ये स्थापन केलेल्या आपत्ती व्यवस्थापन कक्षास कळवावे. याकरीता 02140-269026, 8446402126 या क्रमांकावर दिवस-रात्र सेवा उपलब्ध असल्याची माहिती दिली.
या सभेला नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विराज लबडे, तळा पोलीस सहा.निरीक्षक सतिष गवई, मंडळ अधिकारी सी.एस. राऊत, तलाठी किशोर मालुसरे यांसह नगरपंचायतीचे नगरसेवक व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.







