पूरग्रस्तांच्या मदतीला धावणार आपद मित्र

आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सर्तक, तरुणांचाच सहभाग घेण्याचा प्रशासनाचा निर्णय
| अलिबाग । प्रतिनिधी ।
महाड येथील दरड, पूर परिस्थितीनंतर रायगड जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सर्तक झाली आहे. प्रशासकिय यंत्रणेसह गावांतील तरुणांच्या मदतीने आपत्कालीन परिस्थितीशी सामना करण्यासाठी गाव पातळीवर आपद मित्रांची निवड करण्यात आली आहे. आपत्ती निवारणासाठी गावांतील 18 ते 40 वयोगटातील 300 जणांचा सहभाग असून हे आपद मित्र पुरग्रस्तांच्या मदतीला एक वरदान ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

जिल्ह्यात सतत होत असलेल्या खोदकामांमुळे जमीनीची धुप दिवसेंदिवस होत आहे. दरड कोसळ्याच्या घटना सतत वाढत आहेत. ग्रामीण भागासह शहरी भागात पुर परिस्थितीचा धोका वाढू लागला आहे. दरवर्षी पावसात दरड कोसळ्याबरोबरच पुराची समस्या कायमच भेडसावू लागली आहे. दरड व पुर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनासह तालुका, गाव पातळीवरील प्रशासन शर्तीचे प्रयत्न करते. परंतू त्यावर ठोस उपाययोजना करण्यास प्रशासन उदासीन ठरते.

आपत्कालीन परिस्थिती आटोक्यात आणताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागते. आपतीच्या काळात गावांतील तरुणांचाच सहभाग घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. गावातील भौगोलिक परिस्थितीची माहिती स्थानिकांना अधिक असल्याने त्यांच्या मदतीने आपत्ती निवारणासाठी जिल्हा प्रशासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील 18 ते 40 वयोगटातील 300 जणांना प्रशिक्षण दिले. प्रात्यक्षिकांसह वेगवेगळ्या माध्यमातून मार्गदर्शन करून त्यांना आपत्कालीन परिस्थितीत सामना करण्यासाठी बळ देण्याचा प्रयत्न केला. जिल्हयातील माजी सैनिक, एनसीसी कॅडेट, एनएसएसचे विद्यार्थी, नेहरू युवा केंद्राचे युवक युवती, होमगार्ड, पोलीस मित्र, जीवरक्षक, सागरी सुरक्षा दलातील स्वयंसेवक, नागरीक संरक्षण दलाचे स्वंयसेवक व आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रामध्ये कार्य करण्यांना प्राधान्य देण्यात आले. आपत्तीबाबत पुर्व सुचना करणे. आपत्कालीन परिस्थितीत मदत करणे अशी अनेक कामे या मित्रांच्या माध्यमातून केली जाणार आहेत. आपत्कालीन परिस्थितीत गरजूंना मदत करण्यापासून आपदग्रस्तांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

Exit mobile version