| कोर्लई | प्रतिनिधी |
आपण घरांमधून कामानिमित्त, गर्दीच्या ठिकाणी, बाजारात जातो. यावेळी बाहेरच्या वातावरणात हवेमधील धुळीकणाबरोबर सूक्ष्म जंतूंचा सहवास होऊन वेगवेगळे रोगाचा प्रादुर्भाव म्हणजेच आपत्ती येते. यासाठी नेहमी घरात आल्यानंतर चेहरा, हात, पाय साबणाने स्वच्छ करण्याची सवय लावून घ्या. आपले घर, परिसर प्रत्त्येकाने स्वच्छतेची कास धरावी, असे आपत्ती व्यवस्थापन तज्ञ तथा रायगड भूषण प्रा.डॉ. जयपाल पाटील यांनी सांगितले. अलिबाग तालुक्यातील बामणगाव ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी महिलांच्या सुरक्षेसाठी 112 क्रमांक, महिलांना बाळंतपणात महाराष्ट्र शासन आरोग्य खात्याची 102 रुगणवाहिकेचा वापर, साप, विंचू दंश व अपघात झाल्यास 108 क्रमांकचे प्रात्यक्षिक देण्यात आले. तसेच महिलांना घरातील गॅस सिलेंडर, फ्रिज यांचेदेखील प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.
यावेळी रायगड भूषण प्रा.डॉ. जयपाल, संजय ठाकुर, आपत्ती सुरक्षामित्र सुरेश खडपे, डॉ. जयप्रकाश पांडे, रूपाली भगत, आशासेविका उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शशिकांत मानकर यांनी केले, तर आभार आशाताई रूपाली भगत यांनी मानले.





