आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
महाड येथे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचा कायम स्वरुपी बेस कँम्प उभारणीचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठविला आहे. तो मंजुर झाला नाही तर राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचा बेस कँम्प महाड येथे सुरु केला जाईल. महाड येथे आपत्ती निवारण नियंत्रण कक्ष सुरु करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
येथे पोलीस मुख्यालयात गृह रक्षक दलाच्या जवानांसाठी आयोजित आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी नागरी संरक्षण दलाचे अतिरिक्त नियंत्रक संजय जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, अलिबाग प्रांताधिकारी प्रशांत ढगे, अलिबाग तहसिलदार मीनल दळवी उपस्थित होते.
जिल्ह्याना गेल्या काही वर्षात अनेक आपत्तींना सामोरे जावे लागले आहे. आपत्तीकाळात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांना जिल्ह्यात दाखल होण्यास वेळ लागतो. अशा वेळी स्थानिक बचाव पथके उपयुक्त ठरू शकतात. त्यामुळे स्थानिक बचाव पथकांचे सक्षमीकरण करणे आवश्यक आहे. हीबाब लक्षात घेऊन गृह रक्षक दला बरोबरच स्थानिक बचाव पथकांचासाठी पावसाळ्यापुर्वी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबीर आयोजित करावे अशा सुचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.
जिल्हा नियोजन विकास निधीतून अलिबाग येथे बहुउद्देशीय सभागृह उभारण्यात येईल. जिल्हा नियोजन विकास निधीतून गेल्या वर्षी रॅपिड रेस्क्यू व्हेईकल खरेदी करण्यात आले आहे. हे वाहन येत्या काही महिन्यात दाखल होणं अपेक्षित आहे., असे पालक मंत्री तटकरे यांनी यावेळी सांगीतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे यांनी केले. संजय जाधव यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
