तळ्यात आपत्ती निवारण कक्ष सज्ज

। तळा । वार्ताहर ।

तळा तालुक्यासाठी आपत्ती व्यवस्थापन आराखडा व नियोजनासह आपत्तीवर मात करण्यासाठी तळा आपत्ती व्यवस्थापन कक्ष सज्ज झाला आहे. तळा तालुक्यात 25 ग्रामपंचायती, 69 महसुली गावे व 1 नगरपंचायत असून तालुका हा डोंगरी व काही भाग खाडीलगत आहे.

जून पासून मान्सूनच्या पावसाला सुरूवात झाली असून पावसाळ्यात दरड कोसळणे अथवा खाडीकिनारी भागात, नदी किनारी भागात पूर येणे अथवा रस्ता खचणे, वाहून जाणे अशा अनेक समस्याना सामोरे जावे लागते, अशावेळी जास्त नुकसान होऊ नये यादृष्टीने तालुका स्तरावर आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात आला आहे. यावेळी ज्या ज्या साधनांचा वापर करता येईल अशा साधनांचा वापर कसे करता येईल याचे प्रशिक्षण व माहिती दिली जाते. त्या दृष्टीने तळा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला आहे.

तळा तालुक्यातील कडक्याची गाणी, बेलघर, जोगवाडी, पुसाटी, गिरणे रोवळा-खोडखोल अदिवासीवाडी, चरई बुद्रुक, वावे हवेली अशी एकुण 8 गावे संभाव्य दरडग्रस्थ म्हणून घोषीत करण्यात आली आहेत. तसेच पूर रेषेखालील गावांचा ही समावेश आराखड्यात करण्यात आला आहे. नुकतेच अधिकारी, पालक अधिकारी, खातेप्रमुख तलाठी, व पोलीस पाटील आदींना मार्गदर्शन केले आहे. धोकादायक इमारती, घरे, संभाव्य दरडग्रस्त गावे, पूर रेषेखालील गावे यांचा आढावा घेण्यात आला असून त्यासाठी आपत्ती काळात पर्यायी निवार्‍याची व्यवस्था करण्यात आली आहे.

दैनंदिन पर्यवेक्षण तलाठी, पोलीस पाटील व सर्व विभागांच्या सभा घेवून त्यानुसार सूचना देण्यात आल्या आहेत. दरडग्रस्त गावांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. अत्यावश्यक महत्वपूर्ण सेवा देणार्‍यांची यादी, प्रथमोपचार पेटी, डॉक्टर, पोलीस यंत्रणा, ग्रामस्तरीय शोध पथक व आपदामित्र, सजेनिहाय स्थानिक कार्यकर्ते व संपर्क यंत्रणा, संभाव्य दरडग्रस्त गावे, संभाव्य पूरग्रस्त गावे, शोधबचाव साहित्य, जेसीबी, ट्रकचालक मालक, पोहणार्‍या व्यक्ती, सर्व कार्यालये व अधिकारी वर्ग, तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, कोतवाल, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, आदींचे संपर्क व आपत्तीत करावयाची कामे याबाबत संभाव्य येणार्‍या आपत्तीवर योग्य रितीने मात करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला आहे. तालुक्यात अतिवृष्टी होत असते. या सर्व गोष्टींचा विचार करून उपाययोजना व आराखडा तयार करून तळा तालुका आपत्ती निवारणासाठी सज्ज झाला आहे. तालुक्यात जुन-जुलै 2007 मध्ये झालेल्या अतिवृष्टीत 60 गावे बाधीत होऊन 2 बालकांचा मृत्यू झाला होता. तसेच 11 गुरांचा मृत्यू झाला होता. 2009 मधे अतिवृष्टीने 2 गावे बाधीत होऊन 2 गुरांचा मृत्यू झाला होता. 3 जून 2020 च्या निसर्ग चक्रीवादळाचा मोठा फटका तळा तालुक्याला बसला होता. त्यावेळी तालुका व्यवस्थापन समिती व कक्षाने चांगले काम केले होते. याचा तळ्यातील नागरिकांना आधार झाला होता. वेळीच सर्व सूचना नागरिकांना मिळाल्याने नागरिकांना सावध राहता आले होते. तालुक्याची भौगोलिक परिस्थिती व पडणारा पाऊस तसेच कोणत्या भागात कोणत्या अडचणी किंवा आपत्ती येऊ शकते. याचा विचार करून तळा तालुक्याचा आपत्ती निवारण आराखडा व उपाययोजनांबाबत नियोजन करण्यात आले आहे.

Exit mobile version