संजय निरुपमांवर शिस्तभंगाची कारवाई

| मुंबई | वृत्तसंस्था |

संजय निरुपम यांचा काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत समाविष्ट करण्यात आला होता. मात्र निरुपम यांनी पक्षविरोधी विधाने करीत, पक्ष सोडण्याचे संकेत यापूर्वीच दिले होते. या पार्श्‍वभूमीवर निरुपम यांचे नाव काँग्रेसने स्टार प्रचारकांच्या यादीतून हटवले आहे. तसेच त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर केले आहे.

पटोले यांच्या वक्तव्यानंतर निरुपम यांनी तातडीने ‘एक्स’वरून प्रत्युत्तर देत, काँग्रेस पक्षाने माझ्यासाठी जास्त उर्जा आणि स्टेशनरी वाया घालवू नये. त्याऐवजी काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्या खुर्च्या आणि उर्जेचा उपयोग पक्ष वाचवण्यासाठी करावा. अगोदरच काँग्रेस पक्ष भीषण आर्थिक संकटाचा सामना करत आहे. मी काँग्रेस पक्षाला एक आठवड्याचा वेळ दिला होता, तो आज पूर्ण होत आहे. उद्या मी स्वत: निर्णय जाहीर करेन, असा थेट इशारा निरुपम यांनी दिला आहे. संजय निरुपम उत्तर-पश्‍चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र महाविकास आघाडीत हा मतदारसंघ उद्धव ठाकरे शिवसेनेच्या वाट्याला गेला. तिथे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून अमोल कीर्तिकर यांच्या उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर निरुपम यांनी त्यांचावर कडक शब्दात टीका केली होती. कीर्तिकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून निरुपम सातत्याने त्यांच्यावर टीका करत आहेत. ‘माझ्याकडे पर्यायांची कमतरता नाही. मी आठवडाभर वाट बघेन आणि मग निर्णय घेईन’, असा सूचक इशाराही निरुपम यांनी पक्षाला दिला होता.

निरुपम यांनी पक्ष सोडण्याचे जाहीर केल्यानंतर काँग्रेसने त्यांचे नाव स्टार प्रचारकांच्या यादीतुन वगळले आहे. तसेच मित्र पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात सातत्याने टीका करत असल्याने काँग्रेस आता संजय निरुपम यांच्यावर थेट पक्षशिस्तभंगाची कारवाई करण्याचे ठरविले आहे. निरुपम कुणाची तरी सुपारी घेऊन वक्तव्य करत आहेत, त्यामुळे कोणतीही नोटीस न बजावता त्यांच्यावर थेट शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.

Exit mobile version