। पेण । प्रतिनिधी ।
समाजात पोलिसांबरोबर शिस्त आणण्याचे महत्त्वाचे काम हे पत्रकार करत असतात, राजकीय मंडळी कोणालाही घाबरली नाही तरी ते पत्रकारांना घाबरत असतात. पोलीस आणि पत्रकार हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असून, परस्परांमध्ये आपुलकीचे संबंध असतील तर समाज सुधारायला वेळ लागणार नाही, असे उद्गार वडखळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी काढले. वडखळ पोलीस ठाणे आणि पेण तालुक्यातील सर्व पत्रकार बंधू यांच्यामध्ये संवाद बैठकीचे आयोजन वडखळ पोलीस ठाण्याकडून शनिवारी (दि. 28)करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक नरेश थळकर, पोलीस उपनिरीक्षक विजय म्हात्रे, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय देवकाते, पोलीस हवालदार अमोल म्हात्रे, पोलीस शिपाई आकाश तसेच स्थानिक पत्रकार उपस्थित होते.
ज्येष्ठ पत्रकार दत्ता म्हात्रे यांनी पोलीस प्रशासनाने जनसामन्यांत जाऊन त्यांच्यातील एक व्हावे तसेच पत्रकारांना भेडसावणार्या अडचणींवरही प्रकाश टाकला. पत्रकार संतोष पाटील यांनी समस्यांचा उल्लेख केला. पोलिसांकडून अधिक पारदर्शकता आणि वेळेवर माहिती मिळावी, अशी अपेक्षा केली.







