दुर्गवेध युवा मराठा फाऊंडेशनने आणला उजेडात; मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण
| पाली/बेणसे | वार्ताहर |
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दुर्गवेध युवा मराठा फाऊंडेशन मुंबई संस्थेच्या वतीने पालीतील सरसगड किल्ल्यावर शिवजन्मोत्सव सोहळा पार पडला. या कार्यक्रमातील प्रमुख आकर्षण हे दुर्गवेध परिवाराने गेल्या वर्षभर अखंड मेहनत घेऊन दगडांच्या ढिगार्याखाली बुजलेला तटबंदीत असलेला गुप्त दरवाजा शोधला आहे. त्याचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या हस्ते झाला.
मागील कित्येक दशके हा दरवाजा त्यावर कोसळलेल्या जवळपास तीन टन दगड आणि मातीने बुजून गेला होता. सरसगडाला सरस करायचंय या त्यांच्या उक्तीला सार्थ करत परिवाराने हा दरवाजा मोकळा केला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन पाली नगराध्यक्षा प्रणाली शेळके, नगरसेवक जुईली ठोंबरे, पाली पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण, सुधागड तालुका समन्वय समिती सदस्य सुरज शेळके, भरत गोळे, पुरातत्वीय अभ्यासक श्री प्रणित, दुर्गवीर प्रतिष्ठानचे सुमित जाधव व त्यांचे दुर्गसेवक, शिवस्मरण प्रतिष्ठान यांच्यासह पाली, तळई परिसरातील नागरिक उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुप्त दरवाजा उजेडात आणण्याच्या कामगिरीवर सहभागी सर्व मावळ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच, सर्व पाहुण्यांना इतिहासाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने छ. शिवरायांच्या अस्सल चित्रांचे माहिती व दर्शन घडविणारे केतन पुरी लिखित मर्हाठा पातशहा हे संशोधनपर ऐतिहासिक पुस्तक भेट म्हणून देण्यात आले. तसेच, किल्ले सरसगडचा संक्षिप्त इतिहास सांगताना गडावर बघण्यासाठी असलेला ऐतिहासिक गोष्टींची माहितीही नितेश देसाई यांनी उपस्थितांना सांगितली.
संस्थेच्या श्रद्धा देसाई, दिपक पाटिल, संकेत झंजाड यांनी पाहुण्यांचे आभार मानले. तसेच, यावर्षासाठी संस्थेच्या विनायक शिपुरकर, प्रशांत गावकर, उमेश धुमाळ आदेश शिवेकर, आनंद पवार व पंढरीनाथ भुवड यांची वेगवेगळ्या पदांवर कार्यवाहक म्हणून नियुक्ती करण्यात आली.
नितेश देसाई,
हा दरवाजा आमच्या हातून मोकळा होणे म्हणजे गेली आठ वर्षे सरसगडावर अविरत संवर्धनाचे कार्य करताना छत्रपती शिवराय यांनी कार्याची दिलेली पोच आहे.
दुर्गवेध युवा मराठा फाऊंडेशन, संस्थापक अध्यक्ष