शाळेच्या नामकरणाबद्दल शिक्षणाधिकाऱ्यांशी चर्चा

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील यांचे जन्मगाव असलेला माणिवली येथील जिल्हा परिषद शाळेला हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील नाव देण्याचा ठराव शालेय व्यवस्थापन समितीने केला आहे. या ठरावाबाबत माणिवली शाळेचे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांच्याकडून रायगड जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी यांच्यासोबत चर्चा केली. दरम्यान, या शाळेचे नामकरण लवकरच केले जाईल, असे आश्वासन जिल्हा शिक्षण अधिकारी ललिता दहिफुले यांनी माणिवली शाळा व्यवस्थापन समितीला दिले आहे.

माणिवली या गावातील तरुण हिराजी गोमाजी पाटील यांनी देशासाठी हौतात्म्य प्राप्त केले आहे. त्यामुळे त्यांच्या गावातील जिल्हा परिषद शाळेला हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील शाळा असे नाव देण्याबाबत ठराव शालेय व्यवस्थापन समितीने घेतला आहे. हा ठराव शालेय व्यवस्थापन समितीकडून कर्जत पंचायत समिती शिक्षण विभाग यांना देण्यात आला आहे. त्यात नवीन वर्षात 2 जानेवारी रोजी हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील यांची 83वा बलिदान दिन साजरा होणार आहे. त्यामुळे शालेय व्यवस्थापन समिती माणिवली शाळा आणि कर्जत तालुका आगरी समाज संघटना यांच्याकडून जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी ललिता दहिफुले यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली. शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष जितेंद्र गवळी आणि शिक्षण विभागाचे केंद्र प्रमुख नारायण सोनावणे तसेच आगरी समाज संघटनेचे अध्यक्ष संतोष पेरणे हे उपस्थित होते. दरम्यान, याविषयी आपण लवकरच सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी ललिता दहिफुले यांनी दिले आहे.

Exit mobile version