सिल्व्हर ओकवर होणार दोन दिग्गजांमध्ये चर्चा

शरद पवारांसोबत होणार नव्या समीकरणांवर चर्चा होणार?
। मुंबई । प्रतिनिधी ।
तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आजपासून तीन दिवसांच्या मुंबई दौर्‍यावर आहेत. या दौर्‍यादरम्यान ममता बॅनर्जी इथल्या उद्योगपतींची भेट घेऊन त्यांना बंगाल ग्लोबल बिझनेस समिटला उपस्थित राहण्याचं निमंत्रण देणार आहेत. मात्र, त्याहीपेक्षा ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांच्यात होणार्‍या बैठकीची जोरदार चर्चा मुंबईच्या राजकीय वर्तुळात घडू लागली आहे. नुकतीच ममता बॅनर्जी यांनी राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. या पार्श्‍वभूमीवर मुंबई भेटीदरम्यान ममता बॅनर्जी शरद पवारांची भेट घेणार असल्यामुळे त्यावरून राजकीय तर्क लढवले जाऊ लागले आहेत.

दरम्यान, ममता बॅनर्जी सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवारांची सदिच्छा भेट घेणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्वीट करून सांगितलं आहे. मात्र, दोन पक्षांचे अध्यक्ष आणि त्यातही दोन्ही महत्त्वाचे विरोधीपक्ष असताना या दोन नेत्यांमध्ये राजकीय चर्चा होणार नाही, ही बाब राजकीय विश्‍लेषकांकडून नाकारली जात आहे. त्यामुळे या भेटीमध्ये कोणत्या नवीन समीकरणांवर चर्चा होणार, यावर राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

ममता बॅनर्जी एकूण तीन दिवसांच्या मुंबई दौर्‍यावर असणार आहेत. आजपासूनच या दौर्‍याला सुरुवात झाली असून या तीन दिवसांमध्ये ममता बॅनर्जी इथल्या उद्योगपतींना भेटून त्यांना पुढील वर्षी एप्रिल महिन्यात होणार्‍या बंगाल बिझनेस समिटचं निमंत्रण देणार आहेत. त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट त्यांच्या दौर्‍याच्या नियोजनामध्ये असल्याची माहिती मिळते आहे.

नुकतीच ममता बॅनर्जी यांनी राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या भेटीची एकीकडे चर्चा होत असताना दुसरीकडे ममता बॅनर्जी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना न भेटताच परतल्याची देखील जोरदार चर्चा रंगली होती. तृणमूल आणि राष्ट्रीय काँग्रेस या दोन्ही पक्षांमधील संबंध ताणले गेल्याचंच हे द्योतक असल्याचं राजकीय विश्‍लेषकांचं म्हणणं आहे.

Exit mobile version