भारतीय मुस्लिमांची पुन्हा चर्चा

यातील एक प्रतिक्रिया आहे सुप्रसिद्ध अभिनेते नासिरूद्दीन शहा यांची. काही भारतीय मुस्लिमांनी तालिबानींचा विजय साजरा केल्याबद्दल नासिरूद्दीन शहांनी नाराजी व्यक्त केली आहे. अफगाणीस्तानात तालिबानी सत्तेत येणे हा सर्व जगासाठी चिंतेचा विषय असून, इस्लाममध्ये सुधारणा आणि आधुनिक विचार हवा की काही शतकांपूर्वीची क्रूरता हवी, असा सवाल त्यांनी केला आहे. अशीच एक प्रतिक्रिया बांगलादेशी लेखिका श्रीमती तस्लिमा नसरीन यांची आहे. त्या म्हणाल्या की मुस्लिम समाजावर जेव्हा मुस्लिम समाज अन्याय करत असतो तेव्हा जगभरचे मुसलमान गप्प बसलेले असतात. यासाठी त्यांनी तालिबानचे उदाहरण दिले. त्या पुढे म्हणाल्या की जेव्हा मुस्लिम समाजावर बिगरमुस्लिम समाज अत्याचार करतो तेव्हा जगभरचे मुसलमान याचा दणदणीत आवाजात निषेध करतात. यासाठी त्यांनी पॅलेस्टाईनमध्ये ज्यू समाज तेथील मुसलमानांवर करत असलेल्या अन्यायाचे उदाहरण दिले आहे. यातील दुट्टप्पी भूमिका उघड आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा ‘भारतातील सुमारे वीस कोटी मुस्लिम समाज’ हा विषय ऐरणीवर आला आहे. निवडणूकीच्या राजकारणाचा विचार केल्यास मुस्लिम समाजाच्या हातात देशातील पंधरा टक्के मतं आहेत. काही वर्षांपूर्वींपर्यत एक भाजपा (म्हणजे आधीचा भाजस) वगळता देशातील सर्वच महत्वाचे राजकीय पक्षं मुस्लिम मतांसाठी खास प्रयत्न करत असत. यातूनच ‘मुस्लिमांचे तुष्टीकरण’ वगैरे शब्दप्रयोग रूढ झाले. यात काँगे्रससारखा राष्ट्रीय पक्ष, उत्तर प्रदेशातील ‘समाजवादी पक्ष’, बिहारमधील लालू प्रसाद यांचा ‘राष्ट्रीय जनता दल’ आणि आता ममता बॅनर्जींचा ‘तृणमूल काँगे्रस’, हे पक्षं मुस्लिम तुष्टीकरणासाठी (कु) प्रसिद्ध आहेत.

‘भारतातील मुस्लिम समाज’ हा एक वेगळया प्रकारचा सामाजिक घटक आहे. असा समाज जगात जवळपास कुठेही नाही. ज्या देशांत मुस्लिम समाज जबरदस्त बहुसंख्य असतो ते देश उघडपणे ‘इस्लामी प्रजासत्ताक’ असतात. उदाहारणार्थ सौदी अरेबिया, इराण, कुवेत, पाकिस्तान वगैरे. इतर अनेक देशांत मुस्लिम अल्पसंख्याक असतो आणि त्या देशाच्या घटनेनुसार वागत असतो. मलेशिया हा एकमेव देश आहे जिथे मुस्लिम समाज 65 टक्के आहे म्हणजे साधे बहुमत. तिथं 25 टक्के चीनी तर 10 टक्के भारतीय समाज आहे. परिणामी तेथील मुस्लिम समाजाला या दोन घटकांना सत्तेत वाटा द्यावा लागतो.आपल्या देशाच्या इतिहासाचा विचार केल्यास इथे सुमारे पाचशे वर्षं मुसलमानांची सत्ता होती आणि नंतर दोनशे वर्षं ब्रिटीशांची होती. मुसलमानी सत्त्ताधारी आणि ब्रिटीश सत्ताधारी यांच्यातील एक अतिशय महत्वाचा फरक म्हणजे ब्रिटीशांनी भारताला नेहमीच ‘वसाहत’ मानले. परिणामी इथं आलेला प्रत्येक इंग्रज अधिकारी नोकरी संपल्यावर मायदेशी परत गेला. याला तुरळक अपवाद आहेत. जसं आपले काका/मामादुबई, कतार वगैरेला जातात, तिथं पंधरावीस वर्षं नोकरी करतात पण शेवटी परत येतात. तिथं कोणीही कायमचे राहात नाही. तसंच अनेक इंग्रज अधिकार्‍यांनी केलं. असं मुस्लिम सत्ताधायांबद्दल झालं नाही. मोहम्मद घोरी, गझनीचा मोहम्मद, तैमुरलंग, नादिरशहा वगैरे अपवाद वगळता अनेक मुस्लिम राजे भारतात जन्मले आणि भारतातच मेले. याचा आजच्या संदर्भात राजकीय परिणाम म्हणजे मतांचे राजकारण. म्हणूनच मुस्लिम मतांबद्दल, आजच्या मुस्लिम मानसिकेतबद्दल अधूनमधून चर्चा होत असते. तसं पाहिलं तर हा मुद्दा स्वातंत्र्यपूर्व काळापासून चर्चेत आहे. अगदी सुरूवातीला हा मुद्दा तीव्र स्वरूपात नव्हता. 1857 च्या पहिल्या स्वातंत्र्य लढयात तर हिंदू मुस्लिम एकतेचे अभूतपूर्व दर्शन झाले होते. इ.स. 1885 साली स्थापन झालेल्या ‘अखिल भारतीय काँगे्रस’ पासून भारतात ‘संस्थात्मक राजकारण’ सुरू झाले. 30 डिसेंबर 1906 रोजी ढाक्का येथे ‘ऑल इंडिया मुस्लिम लिग’ हा पक्ष स्थापन झाला. याची प्रतिक्रिया म्हणून 1915 साली ‘हिंदू महासभा’ स्थापन झाली. तेव्हा पासून या मुद्दाची तीव्रता वाढायला लागली. याचा अर्थ असा नाही की भारतातील प्रत्येक मुसलमान व्यक्तीला पाकिस्तान हवा होता. या मागणीला मौलाना अबुल कलाम आझाद यांनी जीव तोडून विरोध केला होता. दुर्दैवाने मुस्लिम लिगच्या विखारी प्रचारापुढे आझाद यांचे पुरोगामी विचार टिकू शकले नाहीत. मार्च 1940 मध्ये मुस्लिम लिगने पाकिस्तानची मागणी करणारा ठराव संमत केल्यानंतर भारतीय स्वातंत्र्य लढ्याने वेगळे वळण घेतले़ मात्र त्याआधीपासून इथे ‘अलगतावादी मुसलमान’ आणि ‘राष्ट्रीय मुसलमान’ असे मुस्लिम समाजाचे दोन गट निर्माण झाले होते. मुस्लिम लिगच्या मागणीचे दृश्य रूप म्हणजे 14 ऑगस्ट 1947 रोजी स्थापन झालेला पाकिस्तान! त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेले असले तरी आणि भारत स्वतंत्र होऊन 75 वर्षं झाली असली तरिही आजही ‘मुस्लिम प्रश्‍न’ चर्चेत आहे.

हेही मान्य केले पाहिजे की जगातील इतर देशांत असलेल्या मुस्लिम समाजापेक्षा भारतातील मुस्लिम समाजावर इतिहासाचे फार मोठे ओझे आहे. ज्या देशावर आपण नजिकच्या भूतकाळात तब्बल पाचशे वर्षे राज्य केले होते आज त्याच देशात आपल्याला सत्ताहीन अवस्थेत वावरावे लागत आहे. ही नवी वस्तुस्थिती मुस्लिम समाजाला पचवता येणे फार अवघड आहे. याचा सर्वात आधी अंदाज सर सैय्यद अहमद खान (1817-1898) यांना आला होता. त्यांच्या लक्षात आले होते की आधूनिक काळात जर टिकायचं असेल, प्रगती करायची असेल तर ज्ञानविज्ञानाची कास धरावी लागेल. याच विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी इ.स. 1875 मध्ये अलिगढ येथे ‘मोहमेडन अँग्लोओरिएंटल कॉलेज’ स्थापन केले होते. याचेच इ.स. 1920 साली ‘अलिगढ मुस्लिम विद्यापीठ’ झाले. त्यांचा मुस्लिम समाजातील अनेक अनिष्ठ रूढींना विरोध होता. त्या काळच्या पद्धतीप्रमाणे त्यांनी स्वमतप्रचारासाठी इ.स. 1870 साली ‘तहजीबउलअखलाक’ हे ऊदूनियतकालिक सुरू केले. त्यांच्या स्मरणार्थ भारत सरकारने 17 ऑक्टोबर 1973 रोजी पोस्टाचे तिकीट काढले होते. सर सैय्यद अहमद खानांचा जन्म 17 ऑक्टोबर 1817 रोजी दिल्ली येथे झाला होता. याचा अर्थ असा की एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात सर सैय्यद अहमद खान यांनी मुस्लिम समाजात पुरोगामी आधुनिक विचारांची मुहूतमेढ रोवली. दुर्दैवाने पुढे याचा म्हणावा तसा विस्तार झाला नाही. महाराष्ट्राचा विचार करायचा झाल्यास हमीद दलवाई (1932-1977) यांनी इ.स. 1970 साली ‘मुस्लिम सत्यशोधक मंडळ’ स्थापन केले. याद्वारे त्यांना मुस्लिम समाजात आधूनिक शिक्षणाचा, पुरोगामी विचारांचा प्रसार करावयाचा होता. हमीद दलवाई यांनी 1966 साली फक्त सात महिलांना घेऊन मुंबईत विधानसभेवर मोर्चा काढला होता. तोंडी तलाक, बहुपत्नीत्व वगैरेंमुळे मुस्लिम समाजातील महिलांवर होणारे अन्याय अत्याचार वेशीवर टांगावे, असा त्यांचा हेतू होता. हमीद दलवाई जसे उत्तम कार्यकर्ता होते तसेच ते विचारवंत होते. शेवटच्या आजारपणात त्यांनी ‘राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान’ हे पुस्तक लिहले. दलवाईंनी मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या माध्यमातून वैचारिक लढा उभारला. त्यांच्या विचारविश्‍वात ‘धर्मनिरपेक्षता’ आणि ‘लोकशाही’ या दोन मूल्यांना फार महत्वाचे स्थान होते. असे असूनही मुस्लिम समाजात पुरोगामी, ऐहिक विचारांना अढळ स्थान मिळाले नाही, असे खेदाने नमुद करणे भाग आहे.

एकविसाव्या शतकात भारतीय मुसलमानांना ओसामा बीन लादेन, आता अफगाणीस्तानात सत्तेत आलेल्या तालिबानींचा विचार करावा लागतो आणि भूमिका ठरवावी लागते. इथे भारतातील मुस्लिम समाजातील वैचारिक फुट समोर येते. नासिरूद्दीन शहासारखे कलावंत तालिबानवर कडक टिका करतात तर काही मुस्लिम नेते तालिबान सत्तेत आल्यामुळे जल्लोष करतात. दुर्दैवाने शहासारखे हाताच्या बोटावर मोजावे इतके कमी आहेत. जे भारतीय मुसलमान सुधारणावादी आहेत ते या ना त्या कारणाने शहासारख्यांना उघडपणे पाठिंबा देत नाहीत. या संदर्भात ‘मुस्लिम सत्यशोधक मंडळ’ सारख्या संघटनांच्या कामाचे कौतुक केलं पाहिजे. आजही हे मंडळ अथकपणे प्रा. डॉ. शमसुद्दीन तांबोळीसारख्यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे. पण काही मुठभर प्रतिगामी विचारांच्या मुल्लामौलवींमुळे भारतातील मुस्लिम समाज बदनाम होत असतो. मुस्लिम समाजातील पुरोगामी शक्तींना कसं बळ मिळेल, याचा विचार केला पाहिजे. ही काळाची गरज आहे.

Exit mobile version