महाडच्या पूरसमस्येवर उपमुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा – खा. तटकरे

महाड | प्रतिनिधी |
महाडच्या पूर समस्येवर ठोस निर्णय घेण्यासाठी लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत बैठक घेण्यात येईल अशी घोषणा रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी आज महाड येथे बोलताना केली.
महाडच्या पूर समस्येवर चर्चा करण्यासाठी आज खा. सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. महाडचे आमदार भरत गोगावले, नगराध्यक्ष स्नेहल जगताप, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, जलसंपदा, महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण , कोकण रेल्वे महामंडळ , परिवहन महामंडळ या विभागाचे प्रमुख अधिकारी, विमा कंपन्यांचे प्रतिनिधी, महाड पूर निवारण समितीचे सदस्य आणि महाडकर नागरिक या बैठकीला उपस्थित होते.
प्रारंभी खा. सुनील तटकरे यांनी महाडकरांची भूमिका विस्ताराने ऐकून घेतली. त्यानंतर रेल्वे पुल, भराव आदि ठिकाणा स्वतंत्रपणे सर्वेक्षण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. रखडलेले धरण प्रकल्प विशेषतः काळ जलविद्युत प्रकल्पाचे काम तातडीने पूर्ण होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
विमा कंपन्यांबाबतच्या तक्रारींचे निराकरण स्थानिक अधिकार्‍यांना करता येणे शक्य नसल्याने वरिष्ठ अधिकार्यांना जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत निमंत्रण करण्याच्या सूचना खा. तटकरे यांनी यावेळेस दिल्या.
नुकसान भरपाईसाठी पंचनाम्यां व्यतिरिक्त अन्य कागदपत्रांची मागणी केली जात आहे. ही कागदपत्रे पुरात वाहून गेली असल्याने केवळ पंचनाम्यांच्या आधारे नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी महाडकरांनी केली. रायगडचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी ही मागणी तेथल्या तेथे मान्य केली. महाडचे आमदार भरत गोगावले यांनी भविष्यात पुराचा धोका कमी करण्यासाठी रखडलेले धरण प्रकल्प आणि बंधार्‍यांची कामे पूर्ण करण्यावर भर देण्यात येईल असे सांगितले. केवळ चर्चा न करता, ज्या काही उपाययोजना सुचविण्यात येत आहेत, त्या उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात अशी आग्रही भूमिका नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांनी मांडली. खा. सुनील तटकरे यांनी चर्चेतील सर्व मुद्यांची दखल घेत आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत एक बैठक घेण्यात येईल असे स्पष्ट केले. पूरग्रस्त घटकांना येत्या आठ दिवसात मदतीचे वाटप करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version