| पाताळगंगा | वार्ताहर |
विधानसभा मतदानाला काही दिवसांचा अवधी असल्यामुळे जिकडे-तिकडे निवडणुकीच्या चर्चा सुरु असून, अनेक ठिकाणी तर्क-वितर्क काढले जात आहेत. 20 तारखेला होत असलेल्या मतदानामुळे पक्षाचे कार्यकर्ते मतदारराजापर्यंत आपला प्रचार पोहोचवित असताना प्रत्येक गावातील किती मतदान होईल. कुणाचे पारडे किती जड आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार? कुणाची रॅली मोठी होती, यावरून आपलाच पक्ष निवडून येणार अशा गप्पांचाच फड रंगलेला अनेक ठिकाणी पहावयास मिळत आहे.
18 वर्षे पूर्ण झालेल्या तरुणांची मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढली असून, यामध्ये युवक मतदारांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात पहावयास मिळत असल्यामुळे ग्रामीण भागात आपलाच उमेदवार विजयी होणार चावडी, हॉटेल, पानटपर्या व कट्ट्यावर विविध पक्षाचे समर्थक विजयाचे गणित मांडत असून, दावे-प्रतिदावे केले जात असल्याचे सर्वत्र पाहावयास मिळत आहे. मतदानासाठी काही दिवसांचा अवधी असल्यामुळे प्रत्येक पक्षाचा पदाधिकारी आणि भेटीगाठीसमवेत मतांची बेरीज-वजाबाकी करण्यात व्यस्त आहे. तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये कोठेही जा केवळ निवडणुकीच्या चर्चा आणि गप्पांचा फड रंगलेला दिसत आहे. प्रचारात आपल्या पक्षाची भूमिका किती महत्त्वाची ठरत आहे. किती मतदान मिळणार? यांचे गणित कार्यकर्ते व पदाधिकारी पटवून देत आहेत. दोन्ही पक्षांचे सर्मथक विजयाचे दावे व प्रतिक्रिया देत आहेत. त्यामुळे कौल कोणाच्या बाजूने राहणार यासाठी मात्र मतदान झाल्यावर समजेल. मात्र, असे असले तरीसुद्धा प्रचार संपल्यानंतर रात्रीच्या वेळी विजयाची गणिते मांडण्यात विविध पक्षाचे उमेदवार आणि कार्यकर्ते मग्न झाले आहे.