नाराज मुनगंटीवारांची अधिवेशनाला दांडी

। नागपूर । प्रतिनिधी ।

भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेला नाही. यानंतरही आपण नाराज नाही, पक्ष जी जबाबदारी देईल ती स्वीकारायला तयार आहोत, असे त्यांचे म्हणणे आहे. तरी हिवाळी अधिवेशनात ते दोन्ही दिवस अनुपस्थित राहिले आहेत. ते सध्या नागपूरमध्येच असून विधानसभेत येणे टाळून त्यांनी आपण नाराज असल्याचा अप्रत्यक्ष संदेश त्यांनी भाजपला दिला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

मंत्रिमंडळाच्या विस्तारापूर्वी आपला मंत्र्यांच्या यादीत समावेश आहे, असे त्यांना सांगण्यात आले होते. मात्र, शपथविधीच्या दिवशी त्यांना कोणीच निरोप दिला नाही. मंत्र्यांच्या यादीतही त्यांचा समावेश नव्हता. याचा मोठा धक्का मुनगंटीवर यांना बसला आहे. विस्ताराच्या दिवशी त्यांनी कुणाशीच संवाद साधला नाही. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ते सभागृहात येतील तेव्हा बोलतील अशी सर्वांचीच अपेक्षा होती. मात्र, त्यांनी विधानभवनाच्या आवारात येण्याचे टाळले. त्याऐवजी त्यांनी नितीन गडकरी यांची भेट घेतल्याचे सांगून वेळ मारून नेली होती. मात्र, त्यांच्या नाराजीची चर्चा भाजपच्या नेत्यांपर्यंत पोहचली आहे. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

मुनगंटीवार आमचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांचा योग्य मान राखला जाईल आणि मोठी जबाबदारी दिली जाईल. याबाबत माझी त्यांच्याशी चर्चा झाली असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. त्यानंतर मुनगंटीवार यांनी फडणवीस आणि माझ्यात काहीच चर्चा झाली नसल्याचे सांगून सर्वांनाच कोड्यात टाकले आहे. मंगळवारी अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी ते सभागृहात येतील अशी अपेक्षा होती. मात्र, दिवसभर ते विधानभवनाकडे फिरकले देखील नाही. एकूणच मुनगंटीवार आणि त्यांचे समर्थक भाजपवर नाराज असल्याची चर्चा विधान भवन परिसरात दिवसभर सुरू होती.

Exit mobile version