। ठाणे । प्रतिनिधी ।
विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर महायुतीत मंत्रीपदावरून जोरदार रस्सीखेच झाली. मंत्रीमंडळाचा विस्तार झाल्यानंतर नाराजीचे सूरही उमटू लागले आहेत. छगन भुजबळ, सुधीर मुनगंटीवार, विजय शिवतारे यांनी उघडपणे नाराजी बोलून दाखवल्यानंतर आता आणखी एक भाजप आमदार देखील नाराज असल्याचे समोर येत आहे. ठाण्यातून तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले भाजप आमदार संजय केळकर यांनी मंत्रीपद न मिळाल्याची खंत व्यक्त केली आहे.
केळकर म्हणाले की, याबाबतचे सर्व निर्णय पक्षाचे केंद्रीय व राज्य नेतृत्व घेत असते. त्यांना कदाचित मी तितका लायक वाटलो नसेन त्यामुळे मला मंत्रीपद दिले नसेल, अशी खंत संजय केळकर यांनी व्यक्त केली आहे. ते पुढे म्हणाले की, मी पक्षाच्या स्थापनेपासून काम करत आहे. त्यावेळी काम करताना कधी आमदार मंत्री व्हायचा विचार केला नव्हता. परंतु, आता माझ्या पक्षश्रेष्टींना जेव्हा मी मंत्रीपदासाठी लायक वाटेन तेव्हा ते जबाबदारी देतील, असेही केळकर म्हणाले आहेत.