अ‍ॅड. महेश मोहिते यांची भाजपच्या जिल्हाध्यक्षपदावरुन उचलबांगडी; महिला प्रकरण भोवले

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
भारतीय जनता पक्षाचे सोलापूरचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर आता दक्षिण रायगडचे अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांचादेखील पक्षाने राजीनामा घेतला आहे. भारतीय जनता पार्टीचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांच्या दुसर्‍या लग्नाचे प्रकरण चांगलेच चिघळले असून पिडित महिलेने मोहितेंविरोधात राज्य आयोगाकडे धाव घेतली आहे. या प्रकरणामुळे रायगड जिल्ह्यातून भाजपवर टीका करण्यात येत होती. अखेर शुक्रवारी (दि.22) भाजपच्या वरिष्ठांनी अ‍ॅड. महेश मोहिते यांची उचलबांगडी केली असून त्यांच्याकडून जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा घेतला.

सोलापूरमधील महिलेने केलेल्या आरोपानंतर दक्षिण रायगड जिल्हा भाजपचे अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा पक्षाने घेतला आहे. सध्या दक्षिण जिल्हाध्यक्ष पदाचा प्रभार उत्तर जिल्हाध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

काय आहे प्रकरण?
विवाहित असूनही घटस्फोट झाल्याचे भासवून या महिलेस अ‍ॅड. महेश मोहिते यांनी संबंधित महिलेस तिच्या पूर्वाश्रमीच्या पतीपासून घटस्फोट घ्यायला लावून या महिलेसोबत लग्न केले. तसेच या महिलेपासून त्यांना एक मुलगीदेखील आहे. मात्र, तिसर्‍या अपत्यामुळे राजकीय करिअर संकटात आल्यानंतर महेश मोहिते यांनी मुलीची ओळख लपवून ठेवण्यासाठी संबंधित महिलेवर दबाव आणण्यास सुरुवात केली, त्यातून धमक्याही दिल्याचा आरोप संबंधित महिलेने केला आहे. नवी मुंबई पोलिस आयुक्तांकडे सोलापुरातील या महिलेने 6 मे 2022 रोजी तक्रार केली होती. या तक्रारीत त्यांनी म्हटले होते की, माझा 2015 मध्ये अलिबाग (जि. रायगड) येथील भाजप जिल्हाध्यक्ष महेश मोहिते यांच्याशी विवाह झाला होता. त्यांनी आमच्या अनेक भेटींमध्ये त्यांचा पत्नीपासून घटस्फोट झाल्याचेदाखविले होते. त्यामुळे मी त्यांच्यासोबत 6 ऑक्टोबर 2015 रोजी नवी मुंबईतील गावदेवी मंदिरात विवाह केला होता. त्यानंतर त्यांच्याकडून फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तक्रारीत त्या महिलेने म्हटले आहे की, माझ्यावर अत्याचार करण्यात आले. माझा व्हिडिओ व्हायरल करुन बदनामी करण्याची धमकीही देण्यात आली. मला आणि माझ्या कुटुंबीयांना त्यांच्याकडून धोका आहे.

एप्रिलमध्ये आयोगाकडे केली तक्रार
दरम्यान, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष देशमुख यांचे प्रकरण समोर आल्यानंतर या महिलेने रविवारी (दि. 17 जुलै) पुन्हा महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. आपल्याला न्याय मिळावा. रायगड आणि सोलापूर पोलिसांकडे दिलेल्या तक्रारींबाबत काय झाले, याबद्दल कळवावे अशी मागणीही त्यांनी केली आहे. तसेच, या रायगड जिल्हाध्यक्षाचे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चांगले संबंध असल्याचेसुद्धा या महिलेने सांगितले आहे, तसेच या वरिष्ठ नेत्यांमध्ये या महिलेने किरीट सोमय्यांपासून ते फडणवीस यांच्यापर्यंत सगळ्यांचीच नावे घेतली आहेत.

Exit mobile version