तळोजा पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा
| पनवेल | प्रतिनिधी |
तळोजा येथील धानसर गावच्या शिवारात उघड्या शेतात घातक रासायनिक कचरा टाकून पर्यावरण व लोकांचे आरोग्य धोक्यात आणणाऱ्या दोन व्यक्तींविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली.
धानसर गावाबाहेरील एका मोकळ्या शेतात पहाटेच्या वेळी काही व्यक्तींनी जमिनीत खड्डा खोदून उघड्यावर घातक रसायने टाकली होती. हे रसायने जमिनीत मुरून मानवी आरोग्य व जीवसृष्टीला धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाल्याची तक्रार स्थानिकांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली. त्यानुसार मंडळाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन 41 ड्रम घन स्वरूपातील रसायने, 36 ड्रम द्रव स्वरूपातील रसायने, 36 रिकामे ड्रम आणि सुमारे 40 ते 50 पांढऱ्या गोणींमध्ये भरलेला घनकचरा हस्तगत केला आहे. याप्रकरणी मोहम्मद अली असगर अली खान (50) आणि अफसर रहिस अहमद खान (39) याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
