| रायगड | खास प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदार संघापैकी अलिबाग आणि पेण विधानसभा मतदार संघाच्या दाव्यावरुन शिवसेना शिंदे गट आणि भाजपामध्ये उभी फुट पडली आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दोन्ही गटाच्या नेत्यांकडून लाज, शरम खुंटीला टांगण्यात आल्याने मतदारांमध्ये त्यांच्या विषयी छी-छी-थू-थू होत आहे. आमदारकीसाठी एक दुसर्याचे चारित्र्य हनन करणार्यांकडे अलिबाग आणि पेण विधानसभेची सूत्रे द्यायची का, असा गंभीर प्रश्न त्या निमीत्ताने मतदारांच्या मनात निर्माण झाला आहे.
आगामी कालावधीत विधानसभेच्या निवडणूका होणार आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. महायुतीच्या ठरावानुसार अलिबाग, कर्जत आणि महाड विधानसभा मतदार संघात शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार निवडणूक लढणार आहे. उरण, पनवेल आणि पेण विधानसभा मतदार संघ भाजपाकडे, तर श्रीवर्धन मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) निवडणूक लढणार आहेत. असे असताना मात्र, उमेदवारीवरुन शिंदे गट आणि भाजपा यांच्यामध्ये चांगलीच जुंपली आहे.
अलिबागमध्ये शिंदे गटातील जिल्हा कार्यकरणीची सभा पार पडली. या बैठकीतून भाजपाला थेट आव्हान देण्यात आले. जिल्हा प्रमुख राजा केणी यांनी भाजपाचे दिलीप भोईर (छोटम) यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली. भोईर यांनी माकडचाळे थांबवावेत. पेणमधील प्रसाद भोईर यांनी देखील जास्त उड्या मारल्या तर पेणमध्ये शिंदे गटाचा उमेदवार उभा करु, असा इशारा दिला आहे. भाजपाने स्वतःच्या कार्यकर्त्यांना वेळीच आवरावे अन्यथा ठिक होणार नाही, असा त्यानी दम भरला आहे. बैठकीमध्ये अलिबाग आणि मुरुडच्या विकासाच्या मुद्याबाबत काही चर्चा होईल, राजकारणात काही चांगले मार्गदर्शन मिळेल, असे वाटले होते, मात्र आलेल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा अंतर्गत वादामुळे चांगलाच हिरमोड झाल्याचे दिसले.
राजा केणी चोर
राजा केणी यांना प्रत्युत्तर देताना दिलीप भोईर यांनी राजा केणी यांच्यावर जोरदार प्रहार केला. विकासाच्या नावावर खोटी बिले काढणारा तू, आम्हाल काय ज्ञान शिकवतोस. तू महाचोर आहेस. गेल्या पाच वर्षात तुमच्या आमदारांनी कोणती विकासकामे केली, साधी आम सभा लावण्यासही आमदार असमर्थ ठरले, अशी संतप्त प्रतिक्रिया भोईर यांनी व्यक्त केली. शुक्रवारी जागतिक आदिवासी दिनानिमित्त अलिबाग-सहाण येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या प्रसंगी भोईर यांनी स्थानिक आमदार महेंद्र दळवींसह राजा केणी यांच्यावर टीकास्त्र सोडले. पाच वर्षात तुम्ही आमसभा बोलवली नाही. जनतेचे प्रश्न तुम्ही काय सोडवणार, असा सवालही त्यांनी केला.