कैचीने केलेल्या हल्ल्यात जागीच ठार
। कल्याण । प्रतिनिधी ।
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात केळीच्या पानांच्या गठ्ठ्यांच्या विक्रीवरून दोन फूल विक्री व्यापार्यांमध्ये रविवारी (दि.27) सकाळी वाद झाला. या वादातून एका विक्रेत्याने दुसर्या विक्रेत्यावर धारदार कैचीने हल्ला करून त्याचा खून केला. चमनलाल कारला (55) असे खून झालेल्या व्यापार्याचे नाव असून, चिराग सोनी (21) असे खून करणार्या व्यापार्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चिराग सोनी आणि चमनलाल कारला हे कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फूल बाजारात केळीची पाने विक्रीचा व्यवसाय करतात. चिराग आणि चमनलाल यांनी एकत्रितपणे जळगाव येथून केळीच्या पानांचे गठ्ठे मागविले होते. या गठ्ठ्यांमध्ये चार पानांचे गठ्ठे हे चमनलाल कारला यांनी मागविले होते. तर, एक केळीच्या पानांचा गठ्ठा हा चिराग सोनी यांनी मागविला होता. जळगाव येथून केळीच्या पानांचे गठ्ठे आल्यानंतर ठरल्याप्रमाणे विभागणी करून दोन्ही व्यापारी या पानांची विक्री करणार होते. परंतु, चमनलाल कारला यांनी चिराग सोनी यांना त्यांचा केळी पानांचा एक गठ्ठा न देता पाचही गठ्ठे स्वतानेच विक्रीसाठी आणले. चिराग सोनी यांनी चमनलाल यांच्याकडे आपला एक केळीचा गठ्ठा देण्याची मागणी केली. त्यावेळी तुला काय करायचे ते कर, मी तुला गठ्ठा देणार नाही, अशी भूमिका चमनलाल यांनी घेतली. या विषयावरून दोघांच्यात बाजार समिती परिसरात रविवारी सकाळी जोरदार वादावादी झाली. या वादातून चिराग यांनी चमनलाल यांच्या पोटावर धारदार कैचीने वार केले. या हल्ल्यात ते जागीच ठार झाले. त्यावेळी चमनलाल यांच्या बचावासाठी त्यांची पत्नी नितू कारला व मुलगा कार्तिक (22) पुढे आले असता त्यांच्यावरही कैचीने हल्ला केला. त्यानंतर चिरागला कल्याण पूर्व चक्कीनाका भागातून पळून जात असताना बाजारपेठ पोलिसांनी पकडले.







