हौशी पर्यटकांचा तोफांवर चढून फोटोशूटींग
| पाली | वार्ताहर |
नववर्षाचं स्वागत करत असतांना अनेक हौशी पर्यटकांचा उन्माद दिसला. काहींना ऐतिहासिक वारशांचे देखील भान राहिले नाही. अनेक पर्यटक घारापुरी किल्ल्यावरील ऐतिहासिक 32 फूट लांब तोफांवर चढून फोटोसेशन करतांना दिसले. या घटनेचा सह्याद्रि प्रतिष्ठान हिंदुस्थान तर्फे निषेध करण्यात आला आहे व संबधीत विभागाकडे लेखी तक्रार देखील करण्यात आली आहे.
घारापुरी बेट हा किल्ला होता. बेटाच्या सुरक्षिततेसाठी तेथे 32 फूट एवढ्या लांबीच्या तोफा तैनात करण्यात आल्या होत्या. त्या आजही तेथे पहायला मिळतात. तसेच जागतिक वारसा म्हणून नोंद असलेल्या लेण्या ही या बेटावर आहेत. सह्याद्रि प्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे सदस्य अमित भुवड, (खेड,रत्नागिरी) हे या ठिकाणी गेले असता त्यांना तोफांवर बसलेले पर्यटक दिसले. त्यांनी पर्यटकांना याबाबत समज दिली आणि तोफांवरून खाली उतरवले.
या बाबत सह्याद्रि प्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे श्रीवर्धन विभागाचे दुर्गसेवक योगेश निवते यांनी सांगितले की, घारापुरी येथे वर्षभर पर्यटक येत असतात. हे बेट (किल्ला) केंद्राच्या ताब्यात आहे. या ठिकाणी पहारेकरी असून सुद्धा जर लोक तोफांवर बसून फोटोशूटींग करत असतील तर मग पहारेकरी झोपा काढतात का? हा प्रश्न उभा राहतो. ऐतिहासिक वास्तूंची नासधूस करणे आणि त्याला सहाय्य करणे हा गुन्हा आहे. या सर्व प्रकाराची सविस्तर तक्रार सह्याद्रि प्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेतर्फे पुरातत्व विभाग आणि स्थानिक पातळीवर करण्यात आली आहे, अशी माहिती योगेश निवते यांनी दिली.







