पालीत वाहतूक कोंडीचे विघ्न

बाह्यवळण मार्गाला मुहूर्त मिळेना, प्रवासी, वाहनचालकांची गैरसोय
। सुधागड-पाली । वार्ताहर ।
अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पालीत वाहतूक कोंडीची समस्या बिकट झाली आहे. त्यातच मागील अनेक वर्षे येथील बलाप येथून जाणारा बाह्यवळण मार्ग प्रलंबित आहे.परिणामी प्रवासी, वाहनचालक व नागरिकांची गैरसोय होत आहे.
अष्टविनायक तीर्थक्षेत्र असल्याने नेहमीच येथे भाविकांची गर्दी असते. पाली हे तालुक्याचे ठिकाण आहे. परिणामी अनेक लोक कामानिमित्त येत असतात. पालीतील अंतर्गत रस्ते अरुंद आहेत. बल्लाळेश्‍वर मंदिर, ग. बा. वडेर हायस्कूल, जुने एस. टी. स्टँड, गांधी चौक, बाजारपेठ, मारुती मंदिर अशा अनेक ठीकाणी नियमित वाहतूक कोंडी होते. वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी काही नाक्यावर वाहतुक पोलीस तैनात असुन देखील अरुंद रस्ते, अवजड वाहतूक, एकेरी वाहतुकीवरुन दुहेरी वाहतुक आणि वाहनचालकांनी वाहतुकिचे नियम न पाळल्याने व रस्त्याच्या दुतर्फात अवैध्यरित्या पार्क केलेली वाहने त्यामुळे पोलीसांना या वाहतुक कोंडीवर नियंत्रण मिळविणे अवघड होते. अनेक वेळा वाहतुक कोंडीमुळे रुग्णांना तसेच रुग्णवाहिकेस रुग्णालयात पोहचण्यास उशिर होतो. संध्याकाळ नंतर मात्र बर्‍याच वेळा वाहतुक पोलीस तैनात नसतात. तर अनेक महत्त्वाच्या ठिकाणी ते नसतात. आणि यावेळी सुद्धा बर्‍याचवेळा वाहतुक कोंडी होते.

बाह्यवळण मार्ग
वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्गावर बलाप गावावरुन थेट बल्लाळेश्‍वर मंदिराच्या पाठीमागे झाप गावाजवळ हा बाह्यवळण मार्ग काढण्यात येणार आहे. त्यासाठी शासनाची मंजुरी देखिल मिळाली आहे. जमीन संपादन देखील झाली आहे. परंतू हा पर्यायी मार्ग अजूनही लालफितीत अडकला आहे.


वाहनांची रेलचेल
मुंबई गोवा महामार्गाचे संथ गतीने सुरु असलेले व अपुर्ण काम यामुळे येथे वाहतुक कोंडी होते. त्यामुळे मुंबई वरुन कोकणाकडे जाणारे प्रवासी पालीतून विळेमार्गे माणगाववरुन किंवा वाकणवरूण पुढे जातात. तर कोकणाकडून येणारी वाहने माणगाववरुन विळे मार्गे पालीतून खोपोलीमार्गे पुणे-मुंबईकडे जातात. परिणामी पालीत वाहनांची रेलचेल वाढून अधिक वाहतूक कोंडी होते. बाह्यवळण मार्ग निर्माण झाल्यास हि वाहणे पालीच्या बाहेरूनच निघून जातील त्यामुळे हि वाहतूक सुरळीत होऊ शकते.

Exit mobile version