महिन्यानंतरही काम संथगतीने
| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी मलनिःसारण प्रकल्प मंजूर झाला आहे. या प्रकल्पाचे कामाला विघ्ने आली असून, महिन्यानंतर प्रकल्पाचे काम सुरू झाले पण ते काम संथगतीने सुरू आहे. माथेरानमध्ये पिण्याच्या पाण्याला महत्त्व देण्यात आल्याने सिमेंट कामे बंद करावी लागत असून, त्याचा फटका मलनिःसारण प्रकल्पालादेखील बसला आहे.
राज्य मानव हक्क आयोग यांच्या आदेशाने माथेरान शहरात मलनिःसारण प्रकल्प मंजूर झाला आहे. शहरातील सांडपाणी दरीमध्ये जाऊन परिसरात प्रदूषण होऊ नये यासाठी माथेरान शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प मंजूर आहे. 50 कोटी खर्चाच्या या प्रकल्पाचे काम सुरू असून, ठेकेदार आणि सल्लागार कंपनी ही आपली जबाबदारी टाळून काम करीत असल्याने प्रकल्पाचे काम पालिकेने थांबवून ठेवले होते. त्यानंतर तब्बल महिन्याने सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. मात्र, नव्याने कामे करताना सिमेंट बांधकाम असलेली कामे सुरू करण्यात आली. त्यात चेंबर आणि पाईप लाईनच्या खाली सिमेंट पीसीसी करणेत येऊ लागली होती. मात्र, पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानमध्ये पर्यटकांसाठी पाण्याची मूलभूत गरज लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्यात आले आहे.
माथेरान शहरात बाहेरून ट्रँकरने पाणीपुरवठा करण्यात येऊ शकत नाही. वाहनांना बंदी असल्याने पाणी कुठून आणायचे, असा मोठा प्रश्न सिमेंट बांधकाम करताना पालिका आणि ठेकेदार यांना पडला आहे. त्यामुळे सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाचे काम संथगतीने सुरू आहे. माथेरान शहरात काही मोठ्या विहिरी असून, त्या विहिरी बंद आहेत. अशा विहिरींमधील पाणी उचलून ते वापरता येऊ शकते आणि त्यासाठी संबंधित विहीर मालक यांची परवानगी महत्त्वाची आहे. हे लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्याला दिलेले स्थान लक्षात घेऊन वायफळ पाणी बचत यावर कटाक्ष टाकून बांधकाम वापरास पाणी उपलब्ध करण्यावर बंधने आली आहेत. त्यामुळे पाण्याआभावी माथेरानमधील सांडपाणी प्रकल्पामधील सिमेंट कामे ठप्प झाली आहेत.