| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन आगाराचे कोलमडलेले वेळापत्रक आणि त्या अनुषंगाने प्रवासी वर्गाला होणारा मनस्ताप यातून सुटका होण्यासाठी अखेर श्रीवर्धन येथील प्रवासी वर्गाने आगारप्रमुख यांची भेट घेतली. प्रवाशांसाठी आवश्यक बसेस सुरू कराव्यात तसेच अनावश्यक बसेस बंद करून काही बसेसच्या मार्गात बदल करावा, या बाबतीत शुक्रवारी (दि.20) भेट घेत निवेदन दिले.
श्रीवर्धन आगाराच्या श्रीवर्धन स्वारगेट लातूर आणि श्रीवर्धन स्वारगेट बीड या दोन्ही बसेस तोट्यात असून ही आगारात कार्यरत असणाऱ्या लातूर व बीड जिल्ह्यातील कर्मचारी वर्गासाठी या बसेस सुरू ठेवण्यात आल्या आहेत. तोट्यातील बससेवा बंद करून श्रीवर्धन तालुक्यातील प्रवासी वर्गासाठी सकाळ व दुपार श्रीवर्धन ते पुणे या मार्गावर बससेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. श्रीवर्धन पासून बोरीवली, नालासोपारा, भाईंदर मार्गावरील अनेक बसेस बोर्लीपंचतन मार्गे मार्गस्थ होतात, या कारणास्तव प्रवासाचे अंतर वाढते व श्रीवर्धन येथील प्रवासी वर्गाचा प्रवास कंटाळवाणा होतो. तसेच श्रीवर्धन ते म्हसळा मार्गावर अनेक खेडेगाव आहेत. या मार्गावरील प्रवासी वर्गाची बसेस अभावी गैरसोय होताना दिसते. दुपार दरम्यान श्रीवर्धन माणगाव व महाड या मार्गावर ठराविक अंतराने बसेस सोडण्यात याव्यात. अलिबाग बसची परतीची वेळ दुपारी दोन ऐवजी चार दरम्यान असावी. प्रवासी वर्गाकडून निवेदन प्राप्त झाल्यानंतर श्रीवर्धन आगारप्रमुख महिबूब मणेर यांनी प्रवासी वर्गाच्या निवेदनाची दखल घेतली जाईल, असे सांगितले. यावेळी चंद्रकांत भगत, देवेंद्र भुसाणे, संतोष वेश्वीकर, मनोज नेवरेकर, यशवंत बाक्कर, अजय चव्हाण, कुमार बाक्कर, मुईद सरखोत, मुजीब चोगले, जाहीद खलीफे, सुरेश करडे, विवेक बंदरकर यांच्यासह शहरातील प्रवासी उपस्थित होते.
व्यवस्थापनाचा हास्यास्पद निर्णय
श्रीवर्धन माणगाव, श्रीवर्धन महाड, श्रीवर्धन बागमांडला या ग्रामीण फेऱ्यांसाठी शिवशाही, स्लीपर कोच बसेस देण्यात येतात. सामान्य प्रवासी वर्गाला या बसेस चे तिकीट दर आवाक्याबाहेर जातात. अनेक थांबे या कारणास्तव शिवशाही बस मधील वातानुकूलित यंत्रणा बंद ठेवण्यात येते.यामुळे प्रवासी वर्गाला हा प्रवास आणखी त्रासदायक होतो.या मार्गावर पुर्वी प्रमाणे साध्या बसेस देण्यात याव्यात.







