माजी आ. जयंत पाटील, जिल्हा उपनिबंधक प्रमोद जगताप यांची उपस्थिती
| अलिबाग | वार्ताहर |
राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण आणि नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे राबविली जात आहे. त्याची सुरूवात रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने करण्यात आलेली आहे. बुधवार, दि. 04 सप्टेंबर रोजी अलिबाग येथील बँकेच्या केंद्र कार्यालयात बँकेचे चेअरमन, माजी आमदार जयंत पाटील आणि रायगड जिल्हा सहकारी संस्थेचे उपनिबंधक प्रमोद जगताप यांच्या वतीने या युवा प्रशिक्षणार्थींना नियुक्ती पत्राचे वाटप करण्यात आले.
यावेळी बँकेचे उपाध्यक्ष सुरेश खैरे, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, कमलाकर वाघमोडे हे उपस्थित होते. यावेळी रायगड जिल्ह्यातून नोंदणी केलेल्या 53 जणांपैकी मनाली चंद्रकांत गायकर, दिप्ती विजय पाटील, ऋत्विक अनिल नागवेकर, प्रियांका कृष्णा पिंगळा, जाई अभय खटावकर, अपेक्षा महेंद्र शेळके, दिपाली विजय पयेर, ओमकार महेश सुर्वे, सुमित राजू दवंडे, सुमित गंगाधर निवाते, सौरभ दिलीप मोरे, देवेश दिलीप चांढवेकर, योगेश हरीराम ढेपे, नेहा चंद्रकांत पाटील, श्वेता विजय वैद्य यांना नियुक्ती पत्राचे वाटप करण्यात आले.
नोंदणी करणार्यांची शैक्षणिक गुणवत्ता तसेच कामकाजासाठी आवश्यक मनुष्यबळ याची सांगड घालून या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणार्थी म्हणून पुढील सहा महिने बँकेमध्ये काम करण्याची संधी प्राप्त होणार आहे. रायगड जिल्हा मध्य. सहकारी बँक ही राज्यातीलच नव्हे तर, देशातील सर्वोत्तम सहकारी बँक म्हणून लोकप्रिय असून, येथील कामकाजाचा अनुभव या प्रशिक्षणार्थींना अधिक लाभदायक ठरेल, असे प्रतिपादन बँकेचे चेअरमन जयंत पाटील यांनी केले. तसेच बँकेच्यावतीने नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये 6000 कोटींच्या व्यवसायाचे लक्ष बँक पूर्ण करणार असून, या माध्यमातून प्रशिक्षणार्थ्यांना बँकेच्या व्यापक विस्ताराची तसेच व्यवसाय भरारीची स्वतंत्र माहिती करून घेता येणार आहे. याकरिता अधिक मेहनतीने आणि उत्साहाने हे प्रशिक्षण पूर्ण करावे, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले आणि सर्व प्रशिक्षणार्थींना शुभेच्छा दिल्या.
या योजनेंतर्गत रोजगार इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक यांना एकत्रित जोडण्याकरिता शासनाच्यावतीने संकेत स्थळ तयार करण्यात आलेले असून, त्याच्यावर झालेल्या नोंदणीप्रमाणे या प्रशिक्षणार्थींना नियुक्ती पत्राचे वाटप करण्यात आलेले आहे. रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणातून मिळून त्यांची क्षमतावाढ होण्याच्या दृष्टीकोनातून तसेच उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या माध्यमातून प्रशिक्षणार्थींना बारावी रू. 6,000/-, आयटीआय/पदविका रू. 8,000/- आणि पदवीधर, पदव्युत्तर यांना रू. 10,000/- प्रतिमहा वेतन सहा मिळणार आहे.