सावित्रीच्या लेकींना पीएनपीत सायकलींचे वाटप

मुलींच्या शिक्षणाच्या दृष्टीने चित्रलेखा पाटील यांचे एक पाऊल पुढे

। अलिबाग । संतोष राऊळ ।

महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीकोनातून ग्रामीण भागातील विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी सीएफटीआयच्या संचालक, शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी सीएफटीआयच्या माध्यमातून आतापर्यंत 17 हजार सायकलींचे वाटप केले आहे. बुधवारी (दि.29) पी.एन.पी. महाविद्यालयाच्या पटांगणावर इंटेव्हा कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर संजय कटारिया यांच्या हस्ते 200 विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करण्यात आले. यावेळी चित्रलेखा पाटील, कंट्री एच आर उर्वशी सिंग ठाकूर, प्लांट मॅनेजर नरेश शेरावत, कंट्री फायनान्स मॅनेजर जतीन कोटेचा, सीएफटीआयचे विशेष कार्यकारी अधिकारी अमित देशपांडे व सीएफटीआय टीम तसेच शेकापचे प्रमुख कार्यकर्ते, गावचे सरपंच उपसरपंच, शिक्षक व पालक आदी उपस्थित होते.


मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून, सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून मोठे शहापूर, धाकटे शहापूर, धेरंड, तळवडे, कुर्डुस, कार्ले, चिंचोटी, चौल, उमटे, ताजपूर आदी गावच्या विद्यार्थिनींना दोनशे सायकलींचे वाटप करण्यात आले. तसेच 11 ग्रामीण भागातील शाळांना इंटेव्हा प्रॉडक्टस कंपनीकडून आरओ वॉटर प्युरिफायर देण्यात आले. या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना सीएफटीआयच्या संचालिका चित्रलेखा पाटील म्हणाल्या की, संपूर्ण राज्यभरात आपल्याला एक लाख सावित्रीच्या लेकींना सायकलींचे वाटप करायचे आहे. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांवर चालत असताना आपण आ. जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी उपक्रम सुरु केला असल्याचे सांगितले. आतापर्यंत आपल्या सगळ्याच संस्थेने चांगल काम केलं आहे. असे त्या म्हणाल्या


यावेळी इंटेव्हा कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर संजय कटारिया म्हणाले की, आम्हाला जेव्हा कळलं की ह्या प्रकल्पामध्ये शिक्षणाबरोबरच मुलींचाहि समावेश आहे त्यामुळे आम्हाला या प्रकल्पाबाबत निर्णय घ्यायला सोपं पडलं. भारतामध्ये आजच्या घडीला स्त्रियांचं जे आर्थिक योगदान आहे ते 20 टक्क्यांपेक्षाही कमी आहे. पुढच्या 25 वर्षात आपल्या देशाला विकसित देश बनवायचं आहे. त्यासाठी पुरुषांसोबत स्त्रियांचाही योगदानाची गरज आहे. पाहायला गेल तर बाकीच्या देशांपेक्षा जास्त भारतीय महिला जास्त कार्यरत आहेत. तसेच सरकार सगळी काम करू शकत नाही. आता जस चित्रलेखा पाटील तसेच इथली लोक मिळून काम करत आहेत त्यातूनच पुढे देशाची प्रगती होत राहणार आहे. सीएफटीआयची संपूर्ण टीम जे काम करत आहे, तरी आम्हाला जेवढं जमेल तेवढं आम्ही सुद्धा या संस्थेसाठी योगदान देणार आहोत. जमलेल्या मुलींना भेटून आनंद झाला व त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.


तसेच चित्रलेखा पाटील व संपूर्ण सीएफटीआयच्या टीमचे आभार मानले. इंटेव्हा कंपनीचे अन्य पदाधिकार्यांनी चित्रलेखा पाटील आणि सीएफटीआयच्या टीमचे कौतुक करताना प्रत्येक कुटुंबाच्या प्रगतीसाठी आणि पर्यायाने देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येक मुलीला शिक्षण देणे महत्त्वाचे आहे. या शिक्षणासाठी फार मोठे कार्य चित्रलेखा पाटील करीत आहेत. ग्रामीण भागातील मुलींना देण्यात येत असलेल्या सायकलींमुळे त्यांना शिक्षण घेणे सोपे होऊन देशाच्या विकासात हातभार लागणार असल्याचा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी प्रास्ताविक व सूत्रसंचालन सीएफटीआयचे विशेष कार्यकारी अधिकारी अमित देशपांडे यांनी केले.

सीएफटीआय ही नवीन आधुनिक संस्था काढली आहे. ही विविध सामाजिक क्षेत्रांमध्ये काम करत आहे. आणि आता संपूर्ण भारतात काम करायला बघत आहे. जून 2019 साली पहिल्यांदा 50 सायकली वाटप केल्या होत्या आणि आज जवळपास 17 हजार सायकली गरजू मुलींना वाटप केल्या आहेत. तसेच सीएफटीआय भविष्यात पाण्यावर संशोधनाचा प्रकल्प सुरु करणार आहे. त्याचबरोबर दृष्टी उपक्रमाअंतर्गत आय चेकअप कॅम्प घेऊन वयोवृद्धांना जवळ जवळ 25 लाख चष्मे वाटपाचा कार्यक्रम करणार आहोत. पहिला 10 हजारांचा कॅम्प अलिबाग व पेण इथे करणार आहोत. तसेच इंटेव्हा कंपनीला धन्यवाद देते.

चित्रलेखा पाटील, सीएफटीआय संचालक
Exit mobile version