सावित्रीच्या लेकी सायकलवर स्वार; सीएफटीआयच्या माध्यमातून चित्रलेखा पाटील यांचा उपक्रम

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीकोनातून ग्रामीण भागातील विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी सीएफटीआयच्या संचालक, शेकाप महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील यांनी सीएफटीआयच्या माध्यमातून आतापर्यंत 14 हजार 623 सायकलींचे वाटप केले आहे. शनिवारी सहाण बायपास येथील सभागृहात गंधार ऑईल रिफायनरीचे संस्थापक तथा चेअरमन रमेश पारेख यांच्या हस्ते 500 विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करण्यात आले.

यावेळी चित्रलेखा पाटील, सुनिता पारेख, समीर पारेख, अश्‍लेष पारेख, सौरभ पारेख, कुणाल पारेख, पायल पारेख, निशिता पारेख यांच्यासह शेकापचे तालुका चिटणीस अनिल पाटील, जिल्हा परिषद सदस्य मधु पारधी, काविरचे सरपंच राजेंद्र म्हात्रे, प्रेरणा कदम, धर्मा लोभी, बामणगावचे उपसरपंच लंकेश नागावकर, अवधूत पाटील, मोहन धुमाळ, नरेश पोईलकर, सुमेध खैरे, सिद्धेश बागवे आदी उपस्थित होते.

या उपक्रमाच्या माध्यमातून रामराज विभागातील बोरघर ग्रामपंचायत हद्दीतील तसेच ग्रामपंचायत कावीर, नांगरवाडी आदी गावच्या विद्यार्थिनींना पाचशे सायकलींचे वाटप करण्यात आले. प्रातिनीधीक स्वरुपात शनिवारी 130 सायकलींचे वाटप करण्यात आले. उर्वरित सायकल त्या त्या गावात जाऊन देण्यात येणार आहेत.

या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना सीएफटीआयच्या संचालक चित्रलेखा पाटील म्हणाल्या की, संपूर्ण राज्यभरात आपल्याला एक लाख सावित्रीच्या लेकींना सायकलींचे वाटप करायचे आहे. आपल्या संस्थेचे काम पाहून स्व. प्रभाकर पाटील आणि स्व. बच्चूभाई मुकादम यांना अभिमान वाटला असता. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांवर चालत असताना आपण आ. जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी उपक्रम सुरु केला असल्याचे सांगितले. शिक्षण हे वाघीणीचे दूध आहे आणि ते सर्वसामान्य गोरगरीबांपर्यंत पोहोचविण्याचा आपला प्रयत्न असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

या उपक्रमात शेकाप कार्यकर्त्यांचेदेखील मोठे योगदान असून, त्यासाठी त्यांना लाल सलाम केला. रमेशभाई पारेख कुटुंबियांना धन्यवाद देत त्यांनी सीएफटीआयच्या संपूर्ण टिमचे आवर्जून कौतुक केले. तर, पायल पारेख यांनी चित्रलेखा पाटील आणि सीएफटीआयच्या टीमचे कौतुक करताना प्रत्येक कुटुंबाच्या प्रगतीसाठी आणि पर्यायाने देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येक मुलाला शिक्षण देणे महत्त्वाचे आहे. या शिक्षणासाठी फार मोठे कार्य चित्रलेखा पाटील करीत आहेत. ग्रामीण भागातील मुलींना देण्यात येत असलेल्या सायकलींमुळे त्यांना शिक्षण घेणे सोपे होऊन देशाच्या विकासात हातभार लागणार असल्याचा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

शेकाचे तालुका चिटणीस अनिल पाटील यांनीदेखील सीएफटीआयच्या कार्याचे कौतुक करीत चार-पाच किलोमीटरपर्यंत पायपीट करुन शाळेत जात असलेल्या मुलींना सायकल दिल्या जात असल्याने त्या सुखावल्या असल्याचे नमूद केले. प्रास्ताविक सीएफटीआयचे अमित देशपांडे, तर सूत्रसंचालन शेकाप पुरोगामी युवक संघटनेचे अलिबाग तालुका अध्यक्ष विक्रांत वार्डे यांनी केले.

Exit mobile version