शेकाप नेत्या चित्रलेखा पाटील यांचा उपक्रम
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्यावतीने ग्रामीण भागातील गरजू, गरीब विद्यार्थीनींना मोफत सायकल वाटपाचा अभिनव उपक्रम अलिबाग-मुरुड तालुक्यात सुरु असून बुधवारी तालुक्यातील आंदोशी येथे सायकल वाटप कार्यक्रम पार पडला. यावेळी चित्रलेखा पाटील यांच्यासह तालुका चिटणीस अनिल पाटील, माजी उपसभापती संदीप घरत, अलिबाग तालुका पुरोगामी युवक संघटनेचे अध्यक्ष विक्रांत वार्डे, शहर पुरोगामी युवक संघटनेच्या अध्यक्षा अक्षया नाईक, सरपंच सुधीर चेरकर, प्रकाश खडपे, नागाव ग्रामपंचायतीच्या सदस्य हर्षदा मयेकर, विलास पाटील, अमित फुंडे, अशोक शिंदे, सुशील पाटील, संदीप चेरकर, सीएफटीआय संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित देशपांडे, साई पाटील आदी उपस्थित होते.
परिसरातील शालेय, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांतील गरीब विद्यार्थी-विद्यार्थिनींना शाळेत जाताना 2 ते 7 किलोमीटर पायपीट करावी लागते, ही त्यांची पायपीट टळावी व त्यांचा उर्वरित वेळ अभ्यासाला मिळावा, या हेतूने चित्रलेखा पाटील यांनी गरजू-गरीब विद्यार्थ्यांसाठी सायकल वाटपाचा उपक्रम सुरु केला आहे. आंदोशी, आंबेपुर, उसर, वरंडे, वरंडेपाडा, देवघर आणि सरई या परिसरातील विद्यार्थींनीना हा लाभ देण्यात आला.
यावेळी बोलताना चित्रलेखा पाटील यांनी आपल्या देशात महिलांची भरारी डोळ्यात भरणारी असली तरी हे चित्र फार समाधानकारक नाही. आजही महिलांना हवी तशी संधी मिळत नाही, हे वास्तव नाकारुन चालणार नाही. विशेषतः ग्रामीण भागात मुलींचे शिक्षण असो कि, महिलांचे सक्षमीकरण परिस्थिती तेवढी चांगली नाही. त्यामुळे याबाबत सरकार आणि समाज या दोन्ही स्तरावर कार्य होण्याची गरज आहे. मुलींचे शिक्षण् हे प्रगतीचे लक्षण आहे हे ओळखून सायकल वाटप ही मोहीम राबविण्यास सुरुवात केली. सावित्रीच्या लेकी चालल्या पुढे या शीर्षकाखाली आज हजारो मुलींना मोफत सायकल वाटप करण्यात येत आहे. ही संकल्पना यापुर्वी बिहारमध्ये राबविण्यात आली होती. भविष्यात या मोहिमेअंतर्गत संपुर्ण महाराष्ट्रात 1 लाख मुलींना सायकल वाटप करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन निलेश पाटील यांनी केले.