सीएफटीआय आणि सोई फाऊंडेशनचा उपक्रम
। अलिबाग । वार्ताहर ।
सीएफटीआय संस्था आणि सोई फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि. 21 मे रोजी गरजू मुलींना 500 सायकलींचे वाटप करण्यात येणार आहे. हा सायकल वाटपाचा कार्यक्रम पीएनपी नाट्यगृहात सकाळी 11 वाजता होणार आहे. मुलींची शालेय शिक्षणासाठी घरापासून शाळेपर्यंत होणारी पायपीट कायमची थांबावी, शालेय शिक्षण कोणत्याही परिस्थितीत थांबू नये यासाठी सीएसटीआयच्या विश्वस्त चित्रलेखा पाटील यांच्या माध्यमातून हजारो मुलींना आतापर्यंत सायकलींचे वाटप करण्यात आले असून, त्यांच्या शिक्षणातील अडसर ठरणारी पायपीट कायमची बंद झाली आहे.
सीएफटीआय आणि सोई फाऊंडेशनच्या माध्यमातून शनिवारी पीएनपीट नाट्यगृहात आयोजित सायकल वाटप कार्यक्रमात अलिबाग तालुक्यातील चिंचवली, माणकुळे, पोयनाड, खंडाळे, कुर्डुस आदी ग्रामपंचायत हद्दीतील जवळपास 360 हून अधिक मुलींना सायकलींचे वाटप करण्यात येणार आहे. तर, बाकी सायकलींचे रोहा तालुक्यातील गरजू मुलींना वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास सीएफटीआय संस्थेच्या विश्वस्त चित्रलेखा पाटील, सोई फाऊंडेशनच्या तरुणा सोई, गौरी सोई यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सावित्रीच्या लेकींना 21 मे रोजी सायकलींचे वाटप
