बालभारतीतून पुस्तकांचे वितरण

| पनवेल | वार्ताहर |

या वर्षी 15 जून पासून शाळेची घंटा वाजणार आहे त्यानुसार पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना पुस्तक मिळावे या उद्देशाने बालभारतीकडून प्रयत्न सुरू आहेत. खांदा वसाहतीतील डेपोमध्ये सुमारे एक कोटी 80 लाख पुस्तक प्रिंट होऊन आले आहेत. त्यांचे वितरण आठ ते दहा गाड्यांच्या मार्फत सुरू करण्यात आले आहे.

राज्यामध्ये बालभारतीचे एकूण नऊ डेपो आहेत. त्यापैकी खांदा वसाहतीमधील एक डेपो आहे. यामध्ये रायगड, पालघर, ठाणे आणि या परिसरातील महानगरपालिकांचा समावेश होतो. येथील सर्व शाळांना याच डेपोमधून पुस्तक वितरित केले जातात. एकूण 25 प्रिंटर्स पुस्तक छपाईसाठी काम करतात. मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, गुजराती, तेलगू, कन्नड, तमिळ, सिंधी या भाषांमध्ये पुस्तक छापण्यात आली आहेत. त्याचबरोबर अंशकालीन अंधाकरताही येथे पुस्तक उपलब्ध आहेत. बालभारती, गणित, परिसर अभ्यास, खेळू आणि शिकू यांचे एकच पुस्तक आहे. त्याचबरोबर आतमध्ये लिहिण्याकरीता पान देण्यात आले आहेत. जेणेकरून विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तर कमी होईल. एका पुस्तकाचे चार भाग करण्यात आले आहेत. यंदा कोणताही अभ्यासक्रम बदललेला नाही त्यामुळे सर्वांना पुस्तकं वेळेत पोहोचतील असे खांदा वसाहतीतील बालभारती डेपोचे प्रभारी भंडार व्यवस्थापक तानाजी सुपे यांनी सांगितले.

Exit mobile version