। उरण । वार्ताहर ।
महसूल विभाग पनवेल आणि उरण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून कर्नाळा ग्राम पंचायत हद्दीतील एकूण सात आदिवासी वाड्या एकत्र करून काही दिवसांपूर्वी आखाडा वाडीवर कॅम्प आयोजित करण्यात आला होता. त्या सर्व आदिवासी बांधवांचे जातीचे दाखले तयार करून ते व्यवस्थित लामीनेशन करून त्याचे वाटप करण्यात आले.
भारताच्या स्वातंत्र्यच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या कातकरी उत्थान अभियाना अंतर्गत सुरू असलेल्या सप्टसुत्री कार्यक्रमाचे अवचीत्य साधून आज जातीचे दाखले वाटप करण्यात आले. त्या वेळेस बोलताना राहुल मुंडके यांनी आदिवासी बांधवांना शिक्षणाकडे लक्ष देण्याची सूचना केली व भविष्यात असा दिवस येईल की तुमच्यातील एक व्यक्ती शिकून मोठा अधिकारी बनून येथे जातीचे दाखले वाटप करण्यासाठी येईल. तसेच त्यांच्या कार्यकाळात जे काही सहकार्य लागेल ते करण्याचे आश्वासन दिले.
तहसीलदार विजय तळेकर यांनी सरकारी योजनांचा लाभ कसा मिळवावा याचे मार्गदर्शन केले. उरण सामाजिक संस्थेचे संतोष पवार यांनी जातीच्या दाखल्याचे महत्त्व समजावून सांगितले. मंडळ अधिकारी मनोज मोरे यांनी आदिवासी बांधवांना प्रगती करायची असेल तर त्याचा मार्ग शिक्षणातूनच जातो हे सांगितले. आदिवासी विकास निरीक्षक सुर्यवंशी तलाठी विनय पाटील, लोंढे तात्या, नामदेव ठाकूर, रत्नाकर घरत कोतवाल आणि सर्व टीम यांनी कार्यक्रमाचे योग्य असे आयोजन केले.