मागासवर्गीय विद्यार्थ्यांना विशेष मोहिमेचा आधार
| अलिबाग | प्रतिनिधी |
अकरावी व बारावी विज्ञान शाळेत शिक्षण घेत असलेल्या, पुढील उच्च शिक्षणासाठी व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला अडकाठी निर्माण होऊ नये, म्हणून जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्यावतीने विशेष मोहिम सुरू करण्यात आली आहे. त्रुटींची पूर्तता करून आतापर्यंत 350 हून अधिक मागास वर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र देण्यात आले आहे. पुढील शिक्षणाच्या प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना या मोहिमेचा आधार मिळाला असल्याचे चित्र आहे.
अभियांत्रिकी पदविका शिक्षण घेणारे तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची जात पडताळणी प्रमाणपत्र मिळविण्याची लगबग सूरू झाली आहे. अलिबागमधील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या कार्यालयात अर्ज जमा करण्यापासून जमा केलेल्या अर्जाची त्रुटी पूर्तता करण्यावर लक्ष दिले जात आहे. त्यासाठी लागणारे कागदपत्रे गोळा करण्यासाठी पालकांसह विद्यार्थी तहसील कार्यालयापासून तलाठी कार्यालय, शाळा, महाविद्यालयात धावाधाव करीत आहेत.
मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वेळेत जात वैधता प्रमाणपत्र मिळावे यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत रायगड जिल्ह्यात विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. 26 जून ते 4 जुल या कालावधीत ही मोहिम राबविण्यात येत आहे. मागासवर्गीय विद्यार्थी व्यावसायिक प्रवेश घेण्यापासून वंचित राहू नये, म्हणून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी नऊ दिवस विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. या कालावधीत त्रुटीची पुर्तता करण्याबरोबरच नव्याने प्रस्ताव सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने या मोहिमेची अंमलबजावमी सूरू केली आहे. त्रुटी असलेल्या कागदपत्रांची पुर्तता करून घेऊन प्रकरण निकाली लावले जात आहे. आतापर्यंत 650 हून अधिक विद्यार्थ्यांना या कालावधीत जात वैधता प्रमाणपत्र देण्यास जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला यश आले आहे. विशेष मोहिमेमुळे विद्यार्थ्यांना अगदी कमी कालावधीत जात वैधता प्रमाणपत्र मिळत असल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हस्य फुलत आहे. पालक वर्गांमध्येदेखील समाधान व्यक्त केले जात आहे. जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी महिना ते दोन महिने प्रतिक्षा करावी लागत होती. ती प्रतिक्षा या विशेष मोहिमेमुळे थांबली असल्याचे चित्र आहे.