मंगळवारी उपजिल्हा रुग्णालयात शिबिराचे आयोजन; तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती
| अलिबाग | प्रतिनिधी |
दिव्यांग बांधवांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी व वितरणासाठी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या आदेशाने तालुकानिहाय विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. श्रीवर्धन येथील उपजिल्हा रुग्णालयात मंगळवार, दि. 23 डिसेंबर रोजी हे शिबीर होणार आहे. या शिबिरासाठी तज्ज्ञ डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. तरी, या शिबिराचा जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, तालुकानिहाय होणाऱ्या शिबिरांसाठी महाड ग्रामीण रुग्णालयात अस्थिव्यंग तपासणीसाठी डॉ. प्रवण बेंडकोळी (अस्थिरोगतज्ज्ञ), माणगाव उपजिल्हा रुग्णालयात डॉ. कोमल सारंगकर (भौतिकोपचारतज्ज्ञ), जिल्हा रुग्णालय अलिबाग ज्ञानदीप भोईर, जिल्हा रुग्णालय विशाल भार्दुगे-समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय, समुपदेशक प्रतिम सुतार, जिल्हा रुग्णालय डॉ. अर्चना सिंग-मानसोपचारतज्ज्ञ, विशाल दामोदरे-मनो सामाजिक कार्यकर्ता, प्रफुल्ला कांबळे-मानसशास्त्र, मंगेश म्हात्रे-केस रजिस्टर असिस्टंट, ग्रामीण रुग्णालय महाड डॉ. शंतनु डोईफोडे-नेत्ररोगतज्ज्ञ, उपजिल्हा रुग्णालय श्रीवर्धन डॉ. राधिका दासानी-नेत्रचिकित्सा अधिकारी या तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
या शिबिरांमध्ये दिव्यांग व्यक्तींची वैद्यकीय तपासणी करून प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येणार असून, पात्र लाभार्थ्यांना विविध शासकीय योजना, सवलती व लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. संबंधित दिव्यांग व्यक्तींनी आवश्यक कागदपत्रांसह शिबिरात उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
