। पेझारी । वार्ताहर ।
पेझारी येथील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या लक्ष्मी-शालिनी महिला महाविद्यालयात महाविद्यालयाचे संस्थापक आणि कोकण एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष अॅड. दत्ता पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधून दि. 4 ते 10 मार्च या कालावधीत नागरी संरक्षण दल उरण-रायगड यांच्या सहकार्याने आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा घेण्यात आली होती. या कार्यशाळेमध्ये एकूण 48 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. त्याचा प्रमाणपत्र वितरण समारंभ माजी सोमवारी (दि.1) आमदार पंडीत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.
संबंधितांना कार्यशाळा पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्र वितरणसाठी माजी आमदार पंडीत पाटील आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बोलताना माजी आमदार पंडीत पाटील यांनी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण घेणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे असे कार्यक्रम जनतेसाठी पुन्हा-पुन्हा राबवून जनतेला प्रशिक्षित केले पाहिजे व जनतेने याकडे प्रामाणिकपणे लक्ष देऊन स्वतःबरोबर कुटुंबाचे, समाजाचे आणि देशाचे रक्षण केले पाहिजे. कारण, आपत्ती ही कधीही घडू शकते म्हणून दक्षता घेणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. असे कार्यक्रम घेण्याबद्दल आमचे पूर्ण सहकार्य प्रशासनाला राहील असेही आश्वासन माजी आमदार पंडितशेट पाटील यांनी दिले.
या कार्यक्रमासाठी बहुसंख्य विद्यार्थिनी, मॉर्निंग वॉक ग्रुपचे अध्यक्ष श्री. प्रकाश नागू म्हात्रे, डॉ.व्यंकटराव कर्ले, अनिल पाटील, सुरेश पाटील, डॉ.दिलीप पाटील, डॉ.संगीता चित्रकोटी,महेश बिर्हाडे, संतोष बिरारे, निलेश कुलाबकर, जयवंत वालेकर, सारिका म्हात्रे, ज्योत्स्ना पाटील, समीर पाटील आदी होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रमाणपत्राचे वाचन डॉ.अनिल बांगर यांनी केले व आभार दलीप सोनवणे यांनी मानले.