वाकण | वार्ताहर |
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून नागोठणे येथील लायन्स क्लबच्या माध्यमातून परिसरातील विविध ठिकाणी प्रथमोपचार पेटीचे वाटप करण्यात आले. अनेक ठिकाणी घडणार्या लहान-मोठ्या अपघातानंतर जखमींना बर्याच वेळा प्रथमोपचार करण्यासाठी लागणारे साहित्य सहज उपलब्ध होत नाहीत. परिणामी, त्यामुळे रक्तस्त्राव जास्त होतो. अपघात झाल्यास जखमींना प्रथमोपचार करण्यासाठी लागणार्या गोष्टी जर लगेच मिळाल्या, तर त्याला धीर मिळतो. याचबरोबर जखमींना रुग्णालयात नेण्यास अवधी मिळतो. या सर्व गोष्टींचे भान ठेवून सेवा भावी संस्था असणार्या नागोठणे येथील लायन्स क्लबच्या माध्यमातून हे फर्स्ट एड बॉक्स (प्रथमोपचार पेटी), बॅन्डेज, विविध प्रकारच्या गोळ्या, ओआरएस एनर्जीची पावडर, हाडांसाठी स्प्रे, जखमेवरची पावडर-पट्ट्या, सॅवलॉन, सिप्ला डाईन अशा प्रकारच्या औषधांचे संंपूर्ण किट देेण्यात आले.
नागोठणे पोलीस ठाणे, नागोठणे बसस्थानक, नागोठणे ग्रामपंचायत कार्यालय, महामार्ग वाहतूक पोलीस चौकी वाकण, महामार्ग वाहतूक पोलीस चौकी ऐनघर या ठिकाणी हे किट लायन्स क्लबच्या माध्यमातून देण्यात आले. यावेळी नागोठणे लायन्सचे अध्यक्ष ला. सुजित महागावकर, उपाध्यक्ष ला. संतोष झोलगे, सेक्रेटरी ला. विवेक सुभेकर, खजिनदार ला. संतोष शहासने, अॅक्टीव्हीटी चेअरमन ला. यशवंत चित्रे, मेंबरशीप चेअरमन ला. विलास चौलकर, डायरेक्टर ला. संतोष मांडवकर आदी लायन्स क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते.