मुंबई वरळी रोटरी क्लबचा मदतीचा हात
। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेची आदिवासी भागातील प्रगत शाळा असा लौकिक असलेल्या रायगड जिल्हा परिषद शाळा झुगरेवाडी येथे रोटरी क्लब वरळी यांच्याकडून धान्यवाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
रायगड जिल्हा परिषदेची झुगरेवाडी शाळा ही एक उपक्रम शील प्रगत शाळा आहे. रायगड जिल्हा परिषद प्रशासनाबरोबरच विविध सामाजिक आणि स्वयंसेवी संस्था यांचा हातभार या शाळेला लाभला आहे. रोटरी क्लब वरळी मुंबई या सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष निमिष संघरजिका, कविता गोडबोले, दीप्ती राजदा यांच्या सहकार्यातून या शाळेत धान्यवाटप करण्यात आले. सदर शाळेतील पहिली ते आठवी इयत्तेतील 100 विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना धान्यवाटप करण्यात आले. यात तांदूळ, डाळी, रवा, साखर आदी 14 जिन्नसांचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी व्यासपीठावर नागेश पाटील, लेखक रवी आमले, स्थानिक दीपक बोराडे, कृष्णा हाबळे, मुख्याध्यापक रवी काजळे, तसेच सरपंच सरिता पादीर आदींसह मच्छिंद्र पादीर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष लक्ष्मण झुगरे, उपाध्यक्ष वसंत पारधी, ग्रामस्थ गणपत झुगरे, सुनील सावळा, भास्कर केवारी आणि सहशिक्षक सतीश घावट, भास्कर केवारी, शिवम खडके, जनार्दन झुगरे यांसह झुगरेवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.