| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यात देशाच्या स्वातंत्र्याच्या लढा उभा राहिला आणि त्यात दोन क्रांतिकारकांना हौतात्म्य प्राप्त झाले. या इतिहासाने केवळ कर्जत तालुक्याचे नाही तर रायगड जिल्ह्याचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिले आहे, असे गौरोवोद्गगार खासदार सुनील तटकरे यांनी काढले आहेत. तसेच, त्यांच्या हस्ते संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या लढ्यातील हुतात्मांच्या शिल्पाचे लोकार्पण करण्यात आले. तसेच, पाणवठा संस्था आणि लेखक गिरीश कंटे यांना हुतात्मा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात आपल्या बलिदानाने अजरामर ठसा उमटविला आहे. हुतात्मा भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी पाटील या भारतमातेच्या दोन सुपुत्रांना अभिवादन करण्यासाठी नेरळ येथील हुतात्मा चौकात सिद्धगड बलिदान दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार सुनील तटकरे यांच्यासह पुंडलिक पाटील, अशोक भोपतराव, एकनाथ धुळे, भगवान चंचे, डॉ. कुशाग्र पटेल, दीपक श्रीखंडे, ॲड. रंजना धुळे, शेखर भडसावळे, शरद भगत, कुमार जाधव, अर्जुन शिंदे, नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राहुल वरोटे, सुजित धनगर, अरुण कार्ले आदी प्रमुख उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान, हुतात्म्यांच्या अर्ध पुतळ्याला खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन केले. त्यानंतर रायगड जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीमधून बांधण्यात आलेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे लढ्याचे शिल्पाचे लोकार्पण खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते झाले.सुरुवातीला हुतात्मा स्मारक समिती अध्यक्ष संतोष पेरणे यांनी प्रास्ताविक केले.







