बियाण्यांचे मिनी किटचे वाटप

| महाड | वार्ताहर |

उत्पादन वाढीसाठी नवनवीन प्रयोग करण्याबरोबरच भाजीपाला लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागाकडून विविध योजना राबवण्यात येत आहेत. यंदा शेतकरी तसेच महिला बचत गटांना भाजीपाला लागवडीसाठी दहा हजार मिनी कीट शंभर टक्के अनुदानाने वाटप करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भाजीपाला लागवड करणे आता सहज शक्य होणार आहे. जिल्ह्यामध्ये वातावरण भाजीपाला लागवडीसाठी अनुकूल आहे. जिल्ह्यात मोठ्या संख्येने पर्यटन येत असून स्थानिक भाजीपाल्याला विशेष पसंती दिली जाते. या सर्वांचा विचार करून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भाजीपाला लागवडीकडे कल वाढवावा, या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांना तसेच शेतकरी गट व महिला बचत गटांना भाजीपाला बियाणांचे मिनी किट पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील 15 तालुक्यांत पंचायत समितीच्या कृषी विभागात दहा हजार मिनी किटचे मोफत वाटप केले जाणार आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील शेतकऱ्यांनीही भाजीपाला बियाणे लागवडीसाठी नेण्यास सुरुवातही केली आहे. या मिनी किटमध्ये मिरची, पालक, भेंडी, घोसाळे, शिराळे, दुधी भोपळा, टोमॅटो, काकडी, बीट अशा विविध भाजीपाला बियाण्यांचा समावेश आहे.

Exit mobile version