| वावोशी | प्रतिनिधी |
परखंदेवाडी येथे एएके प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमांतर्गत राबविण्यात येत असलेल्या कौशल्य विकास कार्यक्रमातील मल्टी स्किल टेक्निशियन प्रशिक्षणाचा प्रमाणपत्र वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. हा उपक्रम होराळे ग्रुप ग्रामपंचायत व उन्नत्व फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे.
या कार्यक्रमाला एएके प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे सीएसआर हेड संदीप निमसे, होराळे ग्रुप ग्रामपंचायतचे मा. उपसरपंच नागेश पाटील तसेच उन्नत्व फाउंडेशनतर्फे प्रोजेक्ट कॉर्डिनेटर शारदा माकोने, उमेश फणसे व कुणाल जाधव यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश परिसरातील बेरोजगार युवकांची तांत्रिक कौशल्ये विकसित करून त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा आहे. उन्नत्व फाउंडेशनच्या माध्यमातून हे प्रशिक्षण संपूर्ण खालापूर तालुक्यात यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. या प्रशिक्षणाचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. प्रशिक्षणार्थी आरती हिरवे व राहुल वाघमारे यांना उन्नत्व फाउंडेशनच्या माध्यमातून जवळच्या रेनोसिस कंपनीत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दोघांनीही संबंधित कंपनीत यशस्वीरित्या कामाला सुरुवात केली असून, हा उपक्रम युवकांच्या प्रगतीसाठी एक आदर्श उदाहरण ठरत आहे.







