शेतकर्‍यांना पॉलिसीचे वाटप

| पाताळगंगा | वार्ताहर |
प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2022 अंतर्गत भारतीय कृषी विमा कंपनी ‘माझी पॉलिसी, माझ्या हातात’ या उपक्रमांतर्गत दि. 1 ते 20 सप्टेंबरपर्यंत कर्जदार शेतकर्‍यांना पॉलिसीचे वाटप सुरू करण्यात आले आहे.

खरीप हंगामात एकूण 434 शेतकर्‍यांनी खालापूर तालुक्यातील पीक विमा उतरविला आहे. त्यापैकी कर्जदार शेतकरी 210 व बिगर कर्जदार 224 शेतकर्‍यांचा समावेश आहे. हा पीक विमा भात व नाचणी पिकांसाठी असतो. भाताचा हेक्टरी हप्ता 1035 रुपये नाचणी चारशे रुपये प्रतिहेक्टरी हप्ता होता. या कार्यक्रमांमध्ये ज्या कर्जदार शेतकर्‍यांनी बँकेमार्फत पीक विमा उतरविला आहे, त्यांना पॉलिसी पत्र वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन तालुका कृषी विभागाच्या वतीने कृषी सहाय्यक निलेश पाटील यांनी केले होते.

गोरठण बुद्रुक येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहामध्ये आयोजित कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी अर्चना सुळ-नारनवर, ग्रामपंचायत गोरठण बुद्रुक सरपंच विक्रांत पाटील, नंदन पाडा ग्रामपंचायत माजी सरपंच सीताराम पाटील, मंडळ कृषी अधिकारी जे.के.देशमुख, बँक ऑफिस इंडिया वावोशी शाखा व्यवस्थापन प्रतीक हीचके, कृषी पर्यवेक्षक धुमाळ, ग्रामसेविका खैरे मॅडम तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version