कळंबोलीतील उद्योजकाकडून शालेय साहित्य वाटप
। अलिबाग । प्रतिनिधी ।
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला गती मिळावी यासाठी कळंबोली येथील उद्योजक धनंजय अवसारे यांनी सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम केले आहे. अलिबाग तालुक्यातील महाजने येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्याकडून शालेय साहित्य देण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर हास्य फुलले. हा कार्यक्रम गावातील तुषार गुंड यांच्या सौजन्याने सोमवारी (दि.14) येथील जि.प. शाळेमध्ये पार पडला.
रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणारे गावे, वाड्या वस्त्यांमधील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आहेत. जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी टिकला पाहिजे यासाठी शिक्षण विभागाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. विद्यार्थी गळती रोखण्यासाठी शैक्षणिक व अशैक्षिक उपक्रम घेऊन विद्यार्थ्यांना घडविण्याचा प्रयत्न केला जातो. वेगवेगळे उद्योजक, व्यवसायिकदेखील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून मदतीचा हात देत असतात. याचाच एक भाग म्हणून उद्योजक धनंजय अवसारे हे नेहमीच शैक्षणिक व सामाजिक उपक्रमात सक्रिय राहिले आहेत. महाजने गावातील युवा नेतृत्व तुषार गुंड यांच्या पुढाकाराने धनंजय अवसारे यांच्या माध्यमातून शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्यात आले आहे. तुषार गुंड, जितेंद्र गुंड, राकेश औचटकर, समीर पाटील तसेच शाळेच्या शिक्षिका सुशिला सांदणकर यांच्या हस्ते दप्तर, पेन आदी शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मिळाल्याने त्यांच्या चेहर्यावर हास्य फुलले होते.
यावेळी जितेंद्र गुंड, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष समीर पाटील, राकेश औचटकर, शाळेच्या शिक्षिका सुशिला सांदणकर, शिक्षक ज्ञानेश्वर घरत व विद्यार्थी उपस्थित होते.
