। पाली/गोमाशी | वार्ताहर।
उन्हाळी सुट्ट्या संपल्यावर जिल्ह्यातील सर्व शाळा शनिवारी (दि.15) सुरु झाल्या. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य, उत्साह आणि आनंद संचारला होता. शाळेमध्ये नवागतांचे जोरदार स्वागत झाले. प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.
शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व पालकांसह विद्यार्थी, शिक्षकांनी सकाळी प्रभात फेरी आणि दिंडी काढली होती. मुलांना पाठ्यपुस्तकांचे वाटप केले गेले. शाळेच्या पहिल्याच दिवशी पहिलीत दाखल मुलांचे गावातून वाजत गाजत, लेझीमच्या तालावर मिरवणूक काढून शाळा पूर्वतयारी मेळावा क्र. 2 ने फुगे, कागदी टोप्या, वर्ग सजावट याने शाळा प्रवेशोत्सव व शाळापूर्व तयारी मेळावा क्र. 2 यशस्वी मेळाव्याचे आयोजन करून नवागत स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले. प्रवेशोत्सव व पाठ्यपुस्तक दिन साजरा करण्यात आला, असे नेणवली शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र अंबिके यांनी सांगितले. काही ठिकाणी विद्यार्थ्यांच्या घरी जावून खाजगी गाड्यांमधून विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यात आले. पोषण आहारात गोड पदार्थ देण्यात आले.
सुधागड तालुका गटशिक्षणाधिकारी साधुराम बांगारे व केंद्रप्रमुख कल्पना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेनुसार यावर्षी नवीन वर्षाची सुरुवात ही प्रवेशोत्सवाने करण्याबाबत नियोजन करण्यात आले. शाळापूर्व मेळाव्या नंतर दाखलपात्र विद्यार्थी व शाळेतील 7 वी पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठयपुस्तक वितरण पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
नवीन शैक्षणिक धोरण अंतर्गत निपुण भारत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान याची यशस्वी अंमलबजावणी साठी हा शाळाप्रवेशोत्सव नक्कीच उपयुक्त ठरेल.
राजेंद्र अंबिके, मुख्याध्यापक,
रजिप शाळा नेणवली
शाळेच्या पहिल्या दिवशी खुप मज्जा आली. नवीन मित्रांची ओळख झाली. वर्षभर खेळ व मौजमजेबरोबरच अभ्यासही जोरात करणार आहे. नवीन दफ्तर, गणवेश, पुस्तके सर्व काही नविन आहे त्यामुळे खुप आनंद झाला आहे.
यज्ञा सुर्वे, विद्यार्थीनी






