| कोर्लई | वार्ताहर |
मुरूड तालुक्यातील आगरदांडा येथे कॉमन सर्व्हिस सेंटर व अदानी फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक सुरक्षा लाभ अभियान अंतर्गत महिलांना शिलाई मशीन संच वाटपाचा कार्यक्रम ग्रामपंचायत कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. ग्रामपंचायत सरपंच आशिष हेदुलकर, उपसरपंच संतोष पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सेंटर आगरदांडाचे प्रमुख शाकिब गजगे व अदानी फाऊंडेशन वरिष्ठ प्रकल्प अधिकारी जयश्री काळे मान्यवर उपस्थित होते.
सुरुवातीला सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात येऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. सर्वसामान्य जनतेसाठी केंद्र आणि राज्य सरकारतर्फे विविध उपक्रम राबविले जातात. या उपक्रमाअंतर्गत महिलांना सशक्त व आत्मनिर्भर करण्यासाठी या अभियान अंतर्गत 6 लाभार्थ्यांना अदानी फाऊंडेशन आणि शासनाच्या सेंटर अंतर्गत व उषा स्किल सेंटर योजना प्रकल्प यांच्या अंतर्गत शिलाई मशीन वाटप करण्यात आले. शासनाच्या विविध योजनांची माहिती व महत्व अदानी फाऊंडेशनचे अवधूत पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात पटवून दिले.
यावेळी सहा लाभार्थ्यांना शिलाई मशीन संच वाटप करण्यात आले. लाभार्थ्यांपैकी नांदले गावातील एका दिव्यांग व्यक्तीलाही शिलाई मशीन संच देण्यात आला. डोंगरी एक व आगरदांडा येथे चार शिलाई मशीन संच देण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अवधूत पाटील, प्राजक्ता आदुळकर यांनी विशेष परिश्रम घेतले.