आदिवासी कुटुंबाना धुररहित चुलीचे वाटप

| पनवेल | वार्ताहर |

आज जागतिक वातावरण झपाट्याने बदलते आहे आणि ह्याला कारण पर्यावरणाचा होत असलेला र्‍हास, कारणे अनेक आहेत आणि त्यातील एक कारण म्हणजे बेसुमार जंगलतोड, आणि जंगल भागात राहणार्‍या आदिवासींना कोणताही पर्याय नसल्याने ते अनाहूतपणे पर्यावरणाच्या र्‍हासाला हातभार लावतात. हे लक्षामध्ये घेऊन रोटरॅक्ट क्लब ऑफ पनवेल इलिट क्लबच्या तरुण सदस्यांनी रोट्रॅक्टर अध्यक्ष समृद्धी मुनोत यांच्या पुढाकाराने महिला दिनाचे औचित्य साधून दहा आदिवासी कुटुंबांना धूर रहित चूलींचे वाटप करण्यात आले.

हा कार्यक्रम पेण तालुक्यातील अत्यंत दुर्गम भागात शिंदळाची वाडी (वरवणे) येथे संपन्न झाला. यावेळी रोटरीयन रितेश मुनोत व मीनल मुनोत यांनी लाभार्थींना ही चूल त्यांच्यासाठी कशी उपयोगी आहे, या चुलीमुळे त्यांच्या जीवनावर आणि आरोग्यावर कसा चांगला परिणाम होईल हे विशद केले. या चुलीचे वैशिष्ट्य म्हणजे या चुलीला मोठी लाकडे असण्याची अजिबात गरज नसते. अगदी जंगलात पडलेल्या झाडाच्या काटक्या वापरून देखील याच्यावर स्वयंपाकाचा वेळ निम्म्याने कमी करता येतो हे त्यांनी समजावून सांगितले. याप्रसंगी वंशी देडिया व प्रिशा मेहता या उपस्थित होत्या. हा प्रकल्प गरीब लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी सुरेंद्र व्यवहारे व शाळेचे मुख्याध्यापक दहिफळे यांनी मोलाचे सहकार्य केले.

Exit mobile version