। उरण । प्रतिनिधी ।
दिव्यांग बांधवांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या आई फाऊंडेशन या सामाजिक संस्थेने मानवतेचा संदेश देणारा प्रेरणादायी उपक्रम राबविला. समाजातील सर्वात वंचित घटक असलेल्या आदिवासी पाड्यांवरील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी खाऊवाटप करण्यात आले. विंधणे आदिवासी वाडी, पिरवाडी आदिवासी वाडी, कोप्रोली आदिवासी वाडी येथील शाळांमधील लहानग्यांच्या चेहऱ्यावर खुललेले आनंदी हास्य हेच या उपक्रमाचे खरे यश ठरले.
दिव्यांग व्यक्तींनी स्वतःच्या अडचणींवर मात करत समाजासाठी उभे राहण्याचा घेतलेला हा निर्धार खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे. आई फाऊंडेशन ही संस्था दिव्यांग बांधव तसेच आदिवासी व वंचित घटकांच्या उत्कर्षासाठी मार्गदर्शन, सहकार्य आणि सामाजिक भान जागृत करण्याचे सातत्याने कार्य करत आहे. संस्थेने यापूर्वीही पूरग्रस्तांना मदत, उरणमधील गरजू दिव्यांगांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, दिव्यांग बांधवांना वेळोवेळी मार्गदर्शन, असे अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले आहेत. यावेळी खाऊवाटपासोबतच प्रत्येक वाडीतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सहकार्य करण्याची भावना संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आली.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे शिलेदार मदन पाटील (अध्यक्ष), राजेंद्र पाटील (उपाध्यक्ष), रणिता ठाकूर (सचिव), महेश पाटील (खजिनदार), सदस्य उमेश पाटील, संदेश राजगुरू, योगेश पाटील, नितीन सांगवीकर, राकेश पाटील यांनी अथक परिश्रम घेतले. तसेच, रामकृष्ण थळी (पिरवाडी आदिवासी वाडी), कल्पेश ठाकूर (कोप्रोली वाडी), नरेश पाटील आणि रमण पंडित (विंधणे आदिवासी वाडी) या शिक्षकांचे सहकार्य लाभले. याशिवाय गणेश पाटील (अध्यक्ष, ग्रामस्थ मंडळ दादरपाडा) चंद्रकांत पाटील (सहव्यवस्थापक, एच.ओ.सी. कंपनी, रसायनी) यांचेही मोलाचे योगदान लाभले.






