पोलादपूर, खेडच्या मृत्युंजय दूतांसाठी स्ट्रेचर वाटप

। पोलादपूर । वार्ताहर ।
महामार्गावरील अपघातप्रसंगी घ्यावयाची दक्षता आणि सतर्कता यामुळे अपघातानंतर जखमींचे जीव वाचविण्याचे काम सुकर होते. चुकीच्या प्रकारच्या रेस्क्यूवर्कमुळेदेखील जखमींच्या जीवाशी खेळ होऊ शकतो, असे मत दि रेसिलेन्ट फाऊंडेशन बोईसर-पालघरचे प्रशिक्षक भूपेंद्र मिश्रा यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य अपर पोलीस महासंचालक वाहतुक मुंबई विभाग डॉ.भूषणकुमार उपाध्याय (भारतीय पोलीस सेवा)यांच्या मार्गदर्शनाखाली हायवे मृत्यूंजय दूत योजनेंतर्गत मृत्यूंजयदुत यांना कशेडी टॅप पोलीसांकडून प्रथमोपचाराबाबत प्रशिक्षण शिबीराचे स्वामी समर्थ मठ कशेडी येथे आयोजन करण्यात आले असता कशेडी टॅप वाहतूक पोलीस उपनिरिक्षक अनिल चांदणे, एएसआय यशवंत बोडकर, रायगडचे ज्येष्ठ पत्रकार शैलेश पालकर मदत ग्रुप आणि मृत्यूंजय देवदुत खेडचे अध्यक्ष प्रसाद गांधी, नूरी उर्फ दादा हयातपीर पालोजी, दीपक उतेकर आदींसह वाहतूक पोलीस स्टाफ आणि मृत्यूंजय देवदुत मोठया संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार शैलेश पालकर आणि दि रेसिलेन्ट फाऊंडेशन बोईसर-पालघरचे प्रशिक्षक भूपेंद्र मिश्रा यांच्याहस्ते खेड आणि पोलादपूर येथील मृत्यूंजय देवदुत सदस्यांना स्ट्रेचरचे मोफत वाटप करण्यात आले.

Exit mobile version