रायगडात 810 पैकी केवळ 444 ग्रामपंचायती ‘क्षयरोगमुक्त’
जिल्हा प्रशासनाकडून विशेष 100 दिवसांचे अभियान सुरू
| रायगड | प्रमोद जाधव |
रायगड जिल्ह्यात क्षयरोगमुक्तीची लढाई अजूनही अधांतरीच असल्याचे चित्र समोर आले आहे. एकूण 810 ग्रामपंचायतींपैकी केवळ 444 ग्रामपंचायती क्षयरोगमुक्त झाल्या असून, संपूर्ण जिल्हा अजूनही ‘क्षयरोगमुक्त’ होण्यापासून दूर असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर क्षयरोग निर्मूलनासाठी जिल्हा प्रशासनाने 100 दिवसांचे विशेष अभियान हाती घेतले असले तरी संपूर्ण रायगड क्षयरोगमुक्त होण्यासाठी अजून मोठा पल्ला गाठायचा आहे.
क्षयरोग या संसर्गजन्य आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी रायगड जिल्ह्यातील क्षयरोग विभागाने व्यापक पावले उचलली आहेत. जिल्हा पूर्णपणे क्षयरोगमुक्त व्हावा, यासाठी विविध उपक्रम राबविले जात असून, सध्या 100 दिवसांचे विशेष अभियान सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत 444 ग्रामपंचायती क्षयरोगमुक्त करण्यात यश आले असले तरी, उर्वरित भागात अजूनही मोठे आव्हान कायम आहे.
क्षयरोग विभागाकडून गावागावात जाऊन तपासणी मोहीम राबवली जाते. संशयित रुग्णांची ओळख पटवून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले जातात. रुग्ण पूर्णपणे बरा होईपर्यंत त्यांना मार्गदर्शन व औषधोपचार देण्यावर भर दिला जातो. तसेच रोगाचा प्रसार रोखण्यासाठी जनजागृती मोहिमा राबवल्या जातात.राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत 2023 पासून ‘क्षयरोगमुक्त ग्रामपंचायत’ अभियान सुरू आहे. या अंतर्गत 2023 मध्ये 90, 2024 मध्ये 376 आणि 2025 मध्ये तब्बल 444 ग्रामपंचायती क्षयरोगमुक्त करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात सध्या 2549 क्षयरुग्णांवर शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत, तर 2101 रुग्णांनी क्षयरोगावर यशस्वी मात केली आहे. जानेवारी ते डिसेंबर 2025 या कालावधीत 4308 रुग्णांची नोंद झाली होती. त्यापैकी 2102 रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून, 1788 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर जानेवारी ते मार्च 2026 या कालावधीत 879 रुग्णांची नोंद झाली असून, त्यापैकी 761 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.
जिल्हा पूर्णपणे क्षयरोगमुक्त करण्यासाठी शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत ‘प्रधानमंत्री टीबीमुक्त भारत’ अभियानांतर्गत विविध क्षेत्रातील व्यक्ती, लोकप्रतिनिधी, अधिकारी तसेच कंपन्या ‘निक्षय मित्र’ बनून क्षयरुग्णांना पोषक आहार उपलब्ध करून देत आहेत.
100 दिवसांच्या अभियानाची रूपरेषा
घरोघरी जाऊन संशयित रुग्णांचा शोध व तपासणी, आधुनिक यंत्रणांच्या सहाय्याने वेळेत निदान, रुग्णांनी औषधोपचारामध्ये खंड पडू नये यासाठी सातत्याने पाठपुरावा, शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी जनजागृती मोहीम, दुर्गम भागांमध्ये विशेष तपासणी शिबिरांचे आयोजन.
रायगड जिल्हा पूर्णपणे क्षयरोगमुक्त करण्यासाठी आरोग्य प्रशासन सातत्याने प्रयत्नशील आहे. 444 ग्रामपंचायती क्षयरोगमुक्त झाल्या असल्या तरी उर्वरित भागात अधिक प्रभावी काम करण्याची गरज आहे. नागरिकांनी क्षयरोगाची लक्षणे आढळल्यास त्वरित शासकीय रुग्णालयात तपासणी करून उपचार सुरू करावेत.
डॉ. प्राची नेहुलकर,
जिल्हा आरोग्य अधिकारी, रायगड जिल्हा परिषद
क्षयमुक्त ग्रामपंचायतीवर दृष्टीक्षेप
| तालुके | संख्या |
| अलिबाग | 54 |
| कर्जत | 27 |
| महाड | 65 |
| माणगाव | 33 |
| पेण | 21 |
| पनवेल | 41 |
| रोहा | 37 |
| श्रीवर्धन | 24 |
| उरण | 27 |
| खालापूर | 18 |
| पोलादपूर | 28 |
| सुधागड | 24 |
| मुरूड | 12 |
| तळा | 6 |
| म्हसळा | 27 |
