पावसाळी पर्यटन वाचविण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांना साकडे

कर्जतमधील व्यापारी हवालदिल
। नेरळ । वार्ताहर ।
गेल्या काही वर्षात कर्जत तालुका पर्यटन तालुका बनला आहे. त्यात पावसाळी पर्यटनासाठी येथील धबधबे आणि धरणांवर पर्यटक हजारोंच्या संख्येने गर्दी करीत असतात. मात्र, प्रशासनाने पावसाळी पर्यटनावर बंदी आणली असून, कर्जत तालुक्यातील पाणवठे यांच्या परिसरात 144 लागू करण्यात आला आहे. दरम्यान, तालुक्यात पावसाळी पर्यटनावर शेकडो कुटुंब अवलंबून असताना केवळ अपघात होतात म्हणून पावसाळी पर्यटन स्थळांवर बंदी लहान सहान व्यावसायिक हवालदिल झाले असून, प्रशासनाने मार्ग दाखवावा यासाठी रायगड जिल्हाधिकारी यांना साकडे घालण्यात आले आहे.
कर्जत तालुक्यात औदयोगिक वसाहत नाही आणि त्यामुळे रोजगाराची खूप मोठी समस्या आहे. त्यात दोन वर्ष कोरोनामुळे अनेकांच्या नोकर्‍या गेल्या आहेत, व्यवसाय बंद पडले आहेत, असेच जर 144 कलम दर वर्षी लावण्यात आले, तर तालुक्यात येणार्‍या पर्यटकांचा ओघ कमी होईल व कर्जतचा पर्यटन व्यवसाय बंद पडेल. पावसाळ्यात अनेक पर्यटक फिरण्यासाठी आणि ट्रेकिंगला कर्जतला पसंती देतात, आषाणे बेकरे, वदप, नेरळ, जुम्मापट्टी, सोलनपाडा, कोंढाणा लेणी, माथेरान, पेब व पेठ किल्ला पांडवलेणी, असे अनेक धबधबे, लेणी, पर्यटन स्थळे व ऐतिहासिक स्थळे आहेत, तालुक्याला निसर्ग सौंदर्य लाभलेले आहे.

या पर्यटन स्थळावर अनेक छोटे मोठे दुकानदार, हॉटेल व्यावसायिक, ग्रामीण भागात घरगुती जेवण देणारे, खानावळ, वडापाव, भजी विक्रेते, हातगाडीवर मक्याचे कणीस विकणारे, चहा, कॉफी विकणारे, सँडविचवाले, पानटपरी असे अनेक छोटे मोठे व्यावसायिक अवलंबून आहेत. त्यात दोन वर्षे लॉकडाऊन, कोरोनामुळे अनेक लोकांचा व्यवसाय बंद पडायच्या मार्गावर आलेत, नोकर वर्गाचा पगार देता येत नाही, बँकेचे हप्ते, रिक्षा, टॅक्सी, टेम्पो, यांचे बँकेचे थकित राहिलेले हप्ते, कुटुंब, घर चालवायचे कसे यात सर्वसामान्य माणूस अडकून गेला आहे, त्यामुळे प्रशासनाने स्थानिक व्यावसायिक यांचा विचार करून आणि त्यांचे कुटुंबाचे उदरनिर्वाह याचा विचार करून मध्यम मार्ग काढावा, अशी मागणी करणारे व्यावसायिक सागर शेळके यांनी रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे केले आहे.

सागर शेळके यांनी आपल्या निवेदनात पर्यटकांची सुरक्षितता लक्षात घेऊन पर्यटन वाढीसाठी स्थानिक प्रशासनाने,ग्रामपंचायत यांना सोबत घेऊन येणार्‍या पर्यटकानकडून योग्य कर घेऊन,त्यातून त्यांच्या सुरक्षितेसाठी लाइफ गार्ड नेमावेत, कचरा व्यवस्थापन करावे, चेंजिंग रूम, टॉयलेट या सुविधा उपलब्ध करुण द्याव्यात, यातून स्थानिक युवकांना रोजगार निर्माण होईल,पर्यटकांना नियम व अटी लागु करावेत, त्यामुळे कर्जत तालुक्यातील पर्यटनात वाढ होईल,व स्थानिक लोकांना, निदान पोटा पुरता का होईना रोजगार निर्माण होईल.त्यामुळे कर्जत तालुक्यातील पर्यटनाला चालना मिळेल असा आशावाद व्यक्त केला आहे. सागर शेळके यांनी कर्जत तालुक्याच्या वतीने आपले निवेदन रायगडचे खासदार श्रीरंग बारणे यांना देखील दिले आहे.

Exit mobile version