जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांचे नाक मुठीत

दुर्गंधीमुळे रुग्ण, नातेवाईक आणि डॉक्टरांचे नाक मुठीत
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग येथील जिल्हा सरकारी रुग्णालयाची डे्रनेज सिस्टीम लिकेज झाल्यामुळे संपूर्ण जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. याबाबत अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पत्रव्यवहार करुन देखील त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने रुग्ण आणि नातेवाईंकांकडून संताप व्यक्त होते आहे. दुर्गंधीमुळे रुग्णालयात उपचारासाठी येणारे रुग्ण त्यांचे नातेवाईक तसेच डॉक्टर्स, नर्स आणि सर्वच कर्मचार्‍यांना अक्षरशः नाक मुठीत धरुनच रहावे लागत आहे. जिल्हा रुग्णालयापासून हाकेच्या अंतरावरच असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयातील अधिकार्‍यांना याकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या मुख्य इमारतीमधील तसेच ओपीडी असलेल्या इमारतीमधील शौचालय आणि स्नानगृहातील सांडपाणी वाहून जाण्यासाठी इमारतीवर सिमेन्टचे पाईप लावण्यात आले आहेत. त्यापैकी दर्शनी भागातील काही पाईपला गळती लागून अनेक महिने लोटले, तरी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिका-यांचे त्याकडे लक्ष जाऊ नये याबाबत रुग्णालयात येणारा प्रत्येकजण आश्‍चर्य व्यक्त करीत असतो. जिल्हा रुग्णालय आवारात उघड्या असलेल्या सांडपाण्याच्या टाक्यांसह गळक्या पाईपमधून वाहणा-या सांडपाण्यापासून मोठ्या प्रमाणात निर्माण होणा:या डासांचा उपद्रव रुग्णालयात उपचार घेणा-या रुग्णांसह त्यांच्या सोबत असणारे.
नातेवाईक, रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिकांना होत असतो. याबाबत जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुहास माने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम खात्याशी संपर्क साधून पत्रव्यवहार केला आहे. या पत्रव्यवहाराचा ग्रंथ होईल इतक्यावेळा लेखी मागणी करुन देखील त्याकडे लक्ष दिले जात नसल्याचे सांगितले.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या हलगर्जीपणामुळे रुग्ण आणि नातेवाईक तसेच डॉक्टर्स, नर्स आणि सर्वच कर्मचार्‍यांचा देखील आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य यंत्रणा लढत असताना सार्वजनिक बांधकाम खात्याच्या उदासीनतेमुळे मात्र इतर आजार निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जिल्हा रुग्णालयापासून हाकेच्या आवारातच सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुख्य कार्यालय आहे. मात्र त्यांना जिल्हा रुग्णालयाच्या डे्रनेज सिस्टीमची अवस्था डोळयांनी रोज दिसत असून देखील त्याकडे जाणीवपूर्वक डोळे झाक केली जात असल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.


सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आतापर्यंत कित्येक वेळा पत्रव्यवहार केला आहे. याचे प्रमाण इतके मोठे आहे की या पत्रव्यवहारांचा एक ग्रंथ होईल. मात्र अजूनही त्याकडे लक्ष दिले जात नसल्याबाबत आश्‍चर्य वाटत आहे.
डॉ सुहास माने, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय

जिल्हा रुग्णालयाच्या ड्रेनेज सिस्टीमची यापूर्वी दुरुस्ती करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा पाहणी करुन त्यावर उपाययोजना करण्यात येईल.
आर एस मोरे, सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता

Exit mobile version