अलिबाग नगरपालिकेने केले जाहीर
। रायगड । प्रतिनिधी ।
अलिबाग नगरपालिकेकडून अलिबाग शहरातील एकूण 31 धोकादायक व अतिधोकादायक इमारतींची यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या यादीमध्ये अलिबागचे मुख्य जिल्हा सामान्य रूग्णालय व रायगड जिल्हा परीषदेची शिवतिर्थ इमारत या दोन शासकीय इमारतींचा ‘अतिधोकादायक’ म्हणून समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या धोकादायक इमारतींमधून शासनाने जनतेला त्वरीत सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्याची तसेच या इमारतींबाहेर ती इमारत अतिधोकादायक असल्याचे फलक लावण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी केली आहे.
अलिबागचे मुख्य जिल्हा रूग्णालय इमारतीमध्ये शेकडो रूग्ण उपचार घेत असून, त्यांच्याबरोबर असणारे नातवाईक, त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय यांचा वावर असतो. तसेच रा.जि.प. शिवतिर्थ इमारत रिकामी केली असली तरी या इमारतीमध्ये राजिपचे जुने रेकॉर्ड असल्याने या इमारतीमध्येही कर्मचारी ये-जा करीत असतात. त्यामुळे येत्या पावसाळ्यात जर या इमारतींना काही धोका उद्भवल्यास शेकडो लोकांचे हकनाक बळी जाण्याची भीती सावंत यांनी व्यक्त केली आहे. या विषयाचे निवेदन त्यांनी रायगडचे जिल्हाधिकारी, रायगड जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड पोलीस अधिक्षक, जिल्हा सामान्य रूग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक, सार्वजनिक बांधकाम, विभागाचे कार्यकारी अभियंता, अलिबाग नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांना ईमेलव्दारे पाठविले आहे. जिल्हा सामान्य रूग्णालयाची इमारत अतिधोकादायक आहे. असे जाहीर करतानाच कार्यकारी अभियंता यांच्या मार्फत या इमारतीवर रॅम्प बांधणे व इतर दुरूस्तीची काम सुरू असून हा कोट्यवधींचा निधी ही इमारत पडल्यास वाया जाणार असल्याने सदरचे काम त्वरीत थांबविण्यात यावीत, अशी मागणीही सावंत यांनी केली आहे.
अलिबाग नगरपालिकेने महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरे अधिनियम 1965 चे कलम 195 नुसार, अलिबाग शहरांतील नमूद मालमत्ता धारकांस आवाहन करण्यात आले की, आपली इमारत किंवा इतर संरचना किंवा अशा इमारतीवर किंवा संरचनेवर बसविलेली कोणतीही वास्तू भग्नावस्थेत असेल किंवा पडण्याचा संभव असेल अशा अतिधोकादायक वास्तू, इमारत किंवा संरचना या नगदपरिषदेकडून देण्यात आलेल्या निर्देशानुसार स्वस्तरावर निष्कासित करण्यात याव्यात. तसेच नगरपरिषदेने बजावलेल्या नोटीशीनुसार धोकादायक वास्तू, इमारत किंवा संरचना यांची मान्यताप्राप्त स्ट्रक्चरल इंजिनियर यांच्याकडून स्ट्रक्चरल ऑडीट करुन घ्यावे. या ऑडीट अहवालानुसार वास्तू, इमारत किंवा संरचना यांची मजबूती, दुरुस्ती करुन घ्यावी, तसेच मजबूती, दुरुस्ती शक्य नसल्यास अशा प्रकारच्या भग्नावस्थेतील वास्तूत कोणीही वास्तव्य करु नये. सदर इमारतीमधील रहिवाशांनी इतरत्र सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत व्हावे. तथापी या उपरही कोणी वास्तव्यास राहिल्यास व त्यामुळे कोणतीही जीवित वा वित्तहानी झाल्यास त्यास नगरपरिषद जबाबदार राहणार नाही, याची नोंद घ्यावी असे जाहिर आवाहन प्रसिध्द केले आहे.
